फुलेवाडीत आढळला ब्लॅक पर्ल वृक्ष | पुढारी

फुलेवाडीत आढळला ब्लॅक पर्ल वृक्ष

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : फुलेवाडी परिसरातील मनपाच्या अग्‍निशमन विभागाच्या मागे असणार्‍या तुळजाभवानी मंदिराजवळ ‘ब्लॅक पर्ल’ (काळा मोती) हा वृक्ष नुकताच आढळला आहे. या वृक्षाची कोल्हापूर जिल्ह्यातील ही पहिलीच नोंद असल्याचे ज्येष्ठ वनस्पतीतज्ज्ञ डॉ. मधुकर बाचुळकर यांनी सांगितले.

वृक्षप्रेमी परितोष ऊरकुडे यांना हा वृक्ष दिसल्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती व छायाचित्रे डॉ. बाचुळकर यांना पाठविली. संदर्भ ग्रंथातून माहिती घेतल्यानंतर या वृक्षाची ओळख पटली. या वृक्षाचे इंग्रजी नाव ‘ब्लॅक पर्ल’ असून याची प्रथमच शास्त्रीय नोंद झाली आहे. कोल्हापूर जिल्हा किंवा महाराष्ट्र राज्याच्या ‘वनस्पती कोश’ ग्रंथात या वृक्षाची नोंद नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

ब्लॅक पर्ल या वृक्षाचे शास्त्रीय नाव ‘माजिडिया झँगयुईबारिका’ (majidea zanguebarica) असे असून हा वृक्ष ‘सॅपिनडेएसी’ (sapindaceae) म्हणजेच रिठ्याच्या कुळातील आहे. ब्लॅक पर्ल हा विदेशी वृक्ष असून तो मुळचा मध्य आफ्रिकेतील आहे. या वृक्षास इतर भाषेतील कोणतीही प्रचलित नावे नाही. वृक्षाच्या वैशिष्ठ्यपूर्ण बियांमुळे याला ब्लॅक पर्ल असे नाव पडले आहे. गोलाकार बिया वाटाण्याएवढ्या आकाराच्या असतात. काळ्या रंगाच्या बियांवर पारदर्शक-रेशमी-मुलायम-मखमली व गुळगुळीत असून काळ्या मोत्यासारख्या दिसतात.

या वृक्षाला जून महिन्यात फुलांचा बहर येतो. फुले लहान पांढरट-पिवळसर-लाल रंगाचा शिडकाव असणारी आणि मंद सुवासिक असतात. फळे त्रिकोणी आकाराची, लांबीपेक्षा रुंदी जास्त, हिरवट रंगाची व पिकल्यावर बदामी-तपकिरी रंगाची होतात. फळे वाळल्यानंतर तीन भागात उकलतात, त्यावेळी ती फारच सुंदर-मनमोहक व आकर्षक दिसतात. बियांपासून रोपे तयार होतात.

Back to top button