ढगाला थोडे हलवून भिजव माझा गाव तू; तुकोबांची पालखी आज लोणी-काळभोर मुक्कामी | पुढारी

ढगाला थोडे हलवून भिजव माझा गाव तू; तुकोबांची पालखी आज लोणी-काळभोर मुक्कामी

सीताराम लांडगे, लोणी काळभोर:

नको पांडुरंगा मला सोन्या-चांदीचे दान रे..
फक्त भिजव पांडुरंगा हे तहानलेले रान रे..
कमरेवरचा हात सोडून आभाळाला लाव तू..
ढगाला थोडे हलवून भिजव माझा गाव तू..
मोह नको, अहंकार नको, नको कपडे छान,
दर वर्षी भरभरून पिकू दे माझ्या शेतकर्‍यांचे रान रे…

अशी विनवणी विश्वाच्या नायकास अर्थात पंढरीच्या पांडुरंगास करीत पंढरीच्या वाटेने निघालेला संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वैष्णवांचा मेळा विठ्ठलाचा नामघोष करीत पुणे-सोलापूर महामार्गाने लोणी काळभोर येथील विठ्ठल मंदिरात शुक्रवारी सायंकाळी सात वाजता मुक्कामी पोहचला. या वेळी ग्रामस्थांनी सोहळ्याचे भव्य स्वागत केले. जागोजागी रांगोळ्याच्या व फुलांच्या पायघड्या घालून फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत झाले. अचानक पावसाने हजेरी लावली. जोरदार पाऊस पडला. अचानक आलेल्या पावसाने सर्वांची पळापळ झाली.

पालखी सोहळ्याने लोणी काळभोरमध्ये प्रवेश केला तेव्हा आमदार अशोक पवार, लोणी काळभोरच्या सरपंच माधुरी काळभोर, उपसरपंच संगीता काळभोर, ग्रामविकास अधिकारी जे. एच. बोरावणे व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी गावच्या वतीने स्वागत केले.
सर्व वारकरी टाळ-मृदंगांच्या तालावर नाचत होते. काही जण फुगड्या खेळत होते. त्याच उत्साहात ग्रामस्थांनी त्यांचे फुलांच्या वर्षावात स्वागत केले.

Janhvi Kapoor : जान्हवीच्या किलर पोझने नेटकऱ्यांना केलं घायाळ (Photos)

दत्त मंदिराजवळ हवेलीचे ज्येष्ठ नेते माधव काळभोर, माजी जि. प. सदस्य विलास काळभोर, काँग्रेसचे शिवदास काळभोर, जिल्हा परिषद सदस्या सुनंदा शेलार, सुभाष काळभोर, पंचायत समितीचे माजी उपसभापती युगंधर काळभोर, माजी उपसरपंच अण्णासाहेब काळभोर यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले. शिवसेनेच्या वतीने महिला जिल्हा संघटक श्रद्धा कदम, पृथ्वीराज कपूर मेमोरिअल हायस्कूलचे ढोल-लेझीम पथक होते, तर कन्याप्रशाळेच्या विद्यार्थिनींची वृक्षदिंडी होती.

पालखी गावातील श्री विठ्ठल मंदिरात मुक्कामी पोहचल्यानंतर आरती झाली. हवेलीचे प्रांताधिकारी संजय आसवले, तहसीलदार तृप्ती कोलते, नायब तहसीलदार अनिल भोसले तसेच गणगे हे दिंड्यांच्या सहकार्यासाठी विशेष लक्ष ठेवून होते. पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी पालखी सोहळ्याच्या सुरक्षेचे चोख नियोजन केले. भजन, कीर्तन, प्रवचन व हरिनामाच्या जागरामुळे लोणी काळभोर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले. या वेळी एकूण 329 दिंड्या सोहळ्यात सहभागी झाल्याची माहिती सोहळाप्रमुख संजय महाराज मोरे व अजित महाराज मोरे यांनी सांगितली.

हेही वाचा

कर्जमुक्‍ती प्रोत्साहन योजनेपासून 90 टक्के शेतकरी अपात्र : राजू शेट्टी

फुलेवाडीत आढळला ब्लॅक पर्ल वृक्ष

आयटी पार्कमध्ये स्थानिक कंपन्यांना प्राधान्य द्या : पालकमंत्री सतेज पाटील

Back to top button