आयटी पार्कमध्ये स्थानिक कंपन्यांना प्राधान्य द्या : पालकमंत्री सतेज पाटील | पुढारी

आयटी पार्कमध्ये स्थानिक कंपन्यांना प्राधान्य द्या : पालकमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापुरात साकारण्यात येणार्‍या आयटी पार्कमध्ये स्थानिक आयटी कंपन्यांना प्राधान्य द्या, अशा सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिल्या. शहरातील टेंबलाईवाडी येथे आयटी पार्क विकसित करण्याबाबत पालकमंत्री पाटील यांनी शुक्रवारी आढावा बैठक घेतली. सार्वजनिक बांधकाम विभाग, अधीक्षक अभियंता यांच्या मिटिंग हॉलमध्ये बैठक झाली. यावेळी महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, आयटी प्रकल्प राबविताना स्थानिक आयटी असोसिएशन व त्यांच्या सदस्यांना प्राधान्य द्या. आयटी पार्क येथे विकसित केलेल्या बांधकामामध्ये 40 टक्क्यांपर्यंत स्थानिक आयटी कंपनीना प्राधान्य द्यावे. तसेच स्थानिक आयटी असोसिएशन आणि महापालिकेसाठी 2000 स्क्‍वे. फूट जागा उपलब्ध करून देण्याबाबत या प्रकल्पामध्ये नियोजन करा. प्रकल्प लवकर अंतिम करण्याच्या सूचना सल्‍लागार कंपनीला दिल्या.

पुणे येथील केपीएमजी यांची आयटी पार्क विकसित करण्यासाठी आर्थिक सल्‍लागार म्हणून नेमणूक केली आहे. या सल्‍लागार कंपनीने आज निविदा दस्तावेजचा प्रारूप मसुदा तयार करून पालकमंत्री व प्रशासकांना सादर केला.

बैठकीस कोल्हापूर शहरातील आयटी असोसिएशनचे पदाधिकारीही उपस्थित होते. यावेळी केपीएमजीचे प्रॉग्रॅम डायरेक्टर राजा डॉन व मॅनेजर जगदीश जे यांनी पालकमंत्र्यांना स्लाईड शोद्वारे या प्रकल्पाची माहिती दिली.

यावेळी अतिरिक्‍त आयुक्‍त नितीन देसाई, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, आयटी असोसिएशनचे अध्यक्ष कैलास मेढे, प्रकल्प अभियंता अरुणकुमार गवळी व आयटी असोसिएशनचे उपाअध्यक्ष मंदार पेटकर, सचिव रणजित नार्वेकर आदी उपस्थित होते.

Back to top button