‘पीओपीचा’च बोलबाला; साडेचार लाख गणेशमूर्ती तयार; शाडूचे प्रमाण 20 टक्के | पुढारी

‘पीओपीचा’च बोलबाला; साडेचार लाख गणेशमूर्ती तयार; शाडूचे प्रमाण 20 टक्के

शंकर कवडे

पुणे : प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्ती उत्पादनावर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने घातलेल्या बंदीच्या आदेशाची अंमलबजावणी महापालिकेने सुरू केली आहे. मात्र, अंमलबजावणीपूर्वीच शहरातील मूर्तिशाळांमध्ये पीओपीच्या लाखो गणेशमूर्ती तयार आहेत. त्यामुळे यंदाही सार्वजनिकसह घरोघरी पीओपीच्याच मूर्ती विराजमान होणार असल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत 12 मे 2020 रोजी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार पीओपीच्या मूर्ती उत्पादनावर बंदी घालण्यात आली आहे.

त्याची अंमलबजावणी पुणे महापालिकेने या वर्षापासून सुरुवात केली आहे. मुळात गणेश विसर्जन झाल्यानंतर मूर्तिकारांकडून गणेशमूर्ती करण्याची लगबग सुरू होते. मेअखेरपर्यंत राज्यातील बहुतांश ठिकाणी मूर्ती घडविण्याचे काम पूर्ण होते. त्यामुळे विसर्जनानंतर पीओपी मूर्तींच्या उत्पादनास बंदी घालण्याचे परिपत्रक काढणे अपेक्षित असताना मूर्तिकाम पूर्ण झाल्याच्या शेवटच्या टप्प्यात परिपत्रक काढले आहे. त्यामुळे शहरातील केशवनगर, लोहगाव, उरुळी कांचन व नवी पेठ परिसरासह उपनगरांमधील मूर्तिशाळांमध्ये लाखो मूर्ती महापालिकेच्या आदेशापूर्वीच तयार झाल्याचे चित्र आहे.

नवनवीन उपचार पद्धतींमुळे कर्करोगावर मात शक्य : डॉ. शिवछंद

धातूच्या मूर्तीचा योग्य पर्याय
पीओपीचा वापर फक्त गणेशमूर्तीसाठीच नाही, तर अन्य ठिकाणीही केला जातो. शास्त्रज्ञांच्या दाव्यानुसार पीओपी विरघळते व त्यासाठी विविध पर्याय आहेत, तर फक्त मूर्तींनाच बंदी का, हाही एक प्रश्न आहे. पीओपी मूर्ती जर पर्यावरणास घातक ठरत असतील, तर मातीच्या गणेशमूर्तीसाठी मोठ्या प्रमाणात माती काढण्यात येईल. तेही एकप्रकारे पर्यावरणास घातक आहे. एकीकडे पीओपीच्या मूर्तींवर बंदीची मोहीम, तर दुसरीकडे माती वाचवा ही मोहीम सुरू आहे. पीओपी व माती या दोन्हींवर पर्याय म्हणून धातूच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेचा पर्याय योग्य ठरेल, अशी भूमिका अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे उपाध्यक्ष सूर्यकांत पाठक यांनी घेतली.

मूर्ती तयार असूनही रंगकाम रखडले
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी राज्यात सुरू झाली आहे. अकोला शहरात जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या आदेशानंतर महसूल विभागाच्या पथकाने दहा कारखान्यांवर धाडी टाकून पाच लाख रुपयांचे साहित्य सील करण्याची कारवाई केली. तशी कारवाई महापालिका प्रशासनामार्फत आपल्यावरही होईल.

गणेशोत्सवात गणेशमूर्तींची संख्या
घरगुती                सुमारे सात लाख
सार्वजनिक          सुमारे दहा हजार
पीओपी मूर्ती    सहा लाखांहून अधिक
शाडू मूर्ती          सत्तर ते ऐंशी हजार

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत दिलेल्या नियमावलीनुसार कामे सुरू आहेत की नाही, हे पाहण्याचे निर्देश शहरातील संबंधित क्षेत्रीय कार्यालयाला दिले आहेत. क्षेत्रीय अधिकार्‍याला तपासणी व कारवाई करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. नियमांचा भंग झाल्यास त्याची पडताळणी करण्यात येईल. कोणत्या प्रकारचा भंग झाला आहे, याचा वस्तुनिष्ठ अहवाल घेतल्यानंतर कारवाई करण्यात येईल.

                             – डॉ. यशवंत माने, उपायुक्त, पर्यावरण विभाग

पीओपी मूर्तींना बंदी असल्यामुळे यंदा पेणहून दरवर्षीच्या तुलनेत जास्त मूर्तींची आगाऊ नोंद करण्यात आली आहे. दरवर्षी एक हजार मूर्तीची विक्री होते. यंदा त्या शंभरने वाढविण्यात आल्या आहेत. पीओपीच्या मूर्तींवरील बंदीमुळे यंदा भक्त शाडूच्या मूर्तींकडे वळतील, अशी अपेक्षा आहे.

                                             – गणेश फाळके, मूर्ती विक्रेते

हेही वाचा

परीक्षा ऑफलाईन एमसीक्यू पद्धतीने घ्या

कोल्हापूर : नेत्यांच्या साठमारीत कार्यकर्त्यांची फरफट

कोल्हापूर : मध्यवर्ती बसस्थानक बनले ’लुटारूंचा अड्डा’

Back to top button