कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा ऑफलाईन एम.सी.क्यू. पद्धतीने घ्याव्यात, या मागणीसाठी विद्यार्थी काँग्रेस (एन.एस.यु.आय) व युवक काँग्रेसतर्फे बुधवारी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. तत्पूर्वी धडक मोर्चा काढून मागण्यांचे निवेदन कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांना देण्यात आले. दरम्यान, आ. ऋतुराज पाटील यांनी कुलगुरूंशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून विद्यार्थ्यांच्या भावनांचा विचार करावा, असे सांगितले.
शिवाजी विद्यापीठाचे बहुतांश अभ्यासक्रम ऑनलाईन पद्धतीने शिकवले आहेत. मात्र, परीक्षा जवळ आली असताना त्या पद्धतीत बदल करून विद्यार्थ्यांना संभ—मात टाकले आहे. मुंबई विद्यापीठ व्यावसायिक अभ्यासक्रम ऑनलाईन परीक्षा पद्धत, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली या विद्यापीठांत एमसीक्यू परीक्षा पद्धतीचा अवलंब केला जाणार आहे.
शिवाजी विद्यापीठाच्या दीर्घोत्तरी परीक्षा पद्धतीमुळे विद्यार्थी प्रवेश, नोकरी अशा ठिकाणी मागे राहतील. त्यामुळे परीक्षा इतर विद्यापीठांप्रमाणे ऑफलाईन एमसीक्यू पद्धतीने घेण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनात 'एनएसयूआय'चे अध्यक्ष अक्षय शेळके, युवक काँग्रेसचे अध्यक्ष उदय पोवार, दीपक थोरात, उमेश पाडळकर, आदित्य कांबळे, मुबीन मुश्रीफ, विनायक पाटील, सत्यजित पाटील, अभिजित भोसले आदींसह एनएसयूआयचे कार्यकर्ते व विद्यार्थी सहभागी झाले होते.