कोल्हापूर : मध्यवर्ती बसस्थानक बनले ’लुटारूंचा अड्डा’ | पुढारी

कोल्हापूर : मध्यवर्ती बसस्थानक बनले ’लुटारूंचा अड्डा’

कोल्हापूर; गौरव डोंगरेे : मध्यवर्ती बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत महिलांचे दागिने, पर्स, मोबाईल पळविण्याच्या घटना दिवसाआड घडताना दिसतात. बाहेरगावी जाणारे अनेक प्रवासी त्यांच्या गडबडीमुळे तक्रार न करताच निघून जातात. मात्र, मागील महिन्याभरात 10 तोळ्यांहून अधिक सोन्याचे दागिने, 4 दुचाकी व मोबाईल या परिसरातून चोरीला गेल्याने प्रवाशांची चिंता वाढली आहे. त्यामुळे ‘मध्यवर्ती बसस्थानक की लुटारूंचा अड्डा’ असा सवाल प्रवाशांमधून उपस्थित होतो आहे.

कोरोना निर्बंध हटविल्यानंतर आणि एसटी कर्मचार्‍यांच्या संपानंतर एसटीच्या सर्व फेर्‍या सुरू झाल्या आहेत. कित्येक दिवसांचा शुकशुकाट अनुभवणार्‍या मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील जनजीवन पूर्वपदावर आले आहे. परंतु यासोबतच प्रवाशांची रेकी करून त्यांना लुटण्याचे, दागिने हिसकावण्याचे प्रकार राजरोस सुरू आहेत. या घटनांमुळे मध्यवर्ती बसस्थानकातील प्रवासी तसेच परिसरातील सुरक्षितताही धोक्यात आली आहे.

फलाटावर प्रकार

एसटी बसेस आल्यानंतर फलाटावर प्रवाशांची गर्दी होते. बसमध्ये जागा मिळविण्यासाठी प्रवासी प्रयत्न करत असतात. अशावेळी दरवाजामध्ये चेंगराचेंगरीचा प्रकार घडतो. नेमका याचाचा फायदा घेत चोरटे महिलांच्या पर्स, गळ्यातील दागिने, प्रवाशांच्या खिशातील मोबाईल, रकमेवर डल्ला मारत आहेत.

घटना : 4 जून : पुणे फलाटावर बसमध्ये चढताना श्रीरंग जयवंत पाटील (रा. तेलवे, ता. पन्हाळा) यांच्या गळ्यातील 15 ग्रॅमची सोनसाखळी सायंकाळी 5 वाजता चोरट्याने लंपास केली.

11 जून : गडहिंग्लज बसमध्ये बसणार्‍या अंजना लक्ष्मण साळवी (रा. कुर्ली, निपाणी) यांची पर्स अज्ञाताने लंपास केली. यामध्ये तीन तोळ्यांचा हार, 1 तोळ्याचे बिल्वर, कानातील सोन्याचे वेल, कुड्या 6 ग्रॅम, कानातील टॉप्स 7 ग्रॅम, अंगठी अडीच ग्रॅम असा ऐवज होता.
25 मे : पुष्पलता सूर्यकांत गवस (रा. दोडामार्ग) या फलाट 8 वर दोडामार्ग एसटीमधये बसताना चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत त्यांचे 32 ग्रॅमचे मंगळसूत्र लांबवले.

पोलिस असल्याची बतावणी

मध्यवर्ती बसस्थानकावरून अडीच लाखांची चोरी झाली असून, चेकिंग सुरू असल्याची बतावणी चार तोतया पोलिसांनी करत ताराराणी चौकात एकाला लुटले. त्याला दागिने रूमालात बांधून ठेवण्यास भाग पाडून दीड तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. यामध्ये चोरट्यांनी गुन्हा करतानाही सीबीएस परिसरातील चोरीचा दाखला दिल्याचे दिसून येते.

बाहेरगावी कामानिमित्त गेलेल्या प्रवाशांना रात्रीअपरात्री पुन्हा परतावे लागते. यामुळे ते स्वत:च्या दुचाकी बसस्थानक आवारात लावून जात असतात. अशा दुचाकीही चोरट्यांनी पळवून नेल्या आहेत. दुचाकीचे लंपास प्रकार : महादेव गडकर (2 जून), बाळासो कावळे (31 मे), सुनील कुलकर्णी (27 मे)

30 मे : मध्यवर्ती बसस्थानकाबाहेर केएमटी बसमध्ये चढताना शंकर मधुकर पुरी यांच्या खिशातील 17 हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरट्यांनी लंपास केला. हा प्रकार सायंकाळी सातच्या सुमारास घडला.

Back to top button