ई-वाहनांसाठी जिल्ह्यात 500 चार्जिंग स्टेशन्स

ई-वाहनांसाठी जिल्ह्यात 500 चार्जिंग स्टेशन्स
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा: महावितरणने राज्यात 13 ठिकाणी इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशन्स सुरू केली आहेत. राज्यात 2 हजार 375 स्टेशन्स प्रस्तावित असून, त्यापैकी 500 चार्जिंग स्टेशन्स पुणे शहर आणि जिल्ह्यात उभारण्यात येणार आहेत. आतापर्यंत महावितरणने आपल्या उपकेंद्रातील अतिरिक्त जागांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांसाठी स्वखर्चाने चार्जिंग स्टेशन्स उभारण्याचे नियोजन करून ठाण्यात 5, नवी मुंबई 2, पुणे 5 आणि नागपूर येथे 1 अशी एकूण 13 चार्जिंग स्टेशन्स सुरू केली आहेत.

याशिवाय महावितरणमार्फत प्रस्तावित अतिरिक्त 49 इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन्सची कामे प्रगतिपथावर आहेत. यात नवी मुंबई येथे 10, ठाणे 6, नाशिक 2, औरंगाबाद 2, पुणे 17, सोलापूर 2, नागपूर 6, कोल्हापूर 2, अमरावती येथे 2 चार्जिंग स्टेशन्सचा समावेश आहे.याचसोबत राज्य शासनाने महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण 2021 हे 23 जुलै 2021 रोजी जाहीर केले.

यानुसार 2025 पर्यंत राज्यातील इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग पायाभूत सुविधा बृहन्मुंबई शहर समूह 1500, पुणे शहर समूह 500, नागपूर शहर समूह 150, नाशिक शहर समूह 100, औरंगाबाद शहर समूह 75, अमरावती 30 आणि सोलापूर 20 अशी एकूण 2,375 तसेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग मुंबई-नागपूर, यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग मुंबई-पुणे, मुंबई- नाशिक, नाशिक-पुणे हे पूर्णत: इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग सुविधांनी सज्ज करण्यात येणार आहेत.

केंद्र सरकारने इलेक्ट्रिक चार्जिंग इकोसिस्टिम सक्षम करण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला किंवा संस्थेला कोणत्याही परवान्याशिवाय सार्वजनिक चार्जिंग स्टेशन सुरू करण्याची परवानगी दिली आहे. बसस्थानक, रेल्वेस्टेशन, पेट्रोल पंप किंवा शॉपिंग मॉलजवळ कुणीही इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन सुरू करू शकतो. याशिवाय आता महामार्गाच्या बाजूला इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन्सही उभारण्यात येत आहेत.

शिवाय राज्य शासनाने इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग पायाभूत सुविधा पुरविण्याकरिता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीस राज्य नोडल एजन्सी म्हणून नियुक्त केले आहे. शिवाय, खासगी व्यक्तींना चार्जिंग स्टेशन उभारायचे असल्यास त्यांना महावितरणतर्फे प्राधान्याने वीजपुरवठा करण्यात येत आहे. राज्य शासनाने जाहीर केलेल्या निर्णयात इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी वित्तीय प्रोत्साहन जाहीर करण्यात आले आहे. निमसार्वजनिक चार्जिंग स्टेशन्ससाठी मंदगतीचे 15,000 चार्जर व मध्यम वेगवान चार्जर 500, अशा एकूण 15,500 चार्जिंग पायाभूत सुविधांसाठी अंदाजे रुपये 40 कोटींची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. या अर्थसाह्यासाठी महावितरणमार्फत अद्ययावत वेबपोर्टल विकसित करण्यात आले आहे.

महावितरणचे मोबाईल अ‍ॅप
इलेक्ट्रिक वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता चार्जिंग स्टेशनची सद्य:स्थिती तसेच भौगोलिक निर्देशांकाची माहिती प्रदान करण्यासाठी महावितरणने 'पॉवर अ‍ॅप ईव्ही' हे मोबाईल अ‍ॅप विकसित केलेले आहे. इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशनची सद्य:स्थिती (उपलब्ध किंवा वापरात आहे), स्टेशन वर्णन, प्लग टाईप, शक्ती (डीसी, एसी), सुरू करण्याची वेळ, उपलब्ध वेळ (अ‍ॅपद्वारे बुकिंग), सद्यःस्थळापासूनचे अंतर, चालू स्थळावरून जवळचे स्टेशन सर्व्हिसमध्ये नसल्यास किंवा उपलब्ध नसल्यास जवळचे पर्यायी चार्जिंग स्टेशन इत्यादी माहिती यावर उपलब्ध आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news