कोल्हापूर : 300 औषधांवर क्यूआर कोडची सक्‍ती | पुढारी

कोल्हापूर : 300 औषधांवर क्यूआर कोडची सक्‍ती

कोल्हापूर ; राजेंद्र जोशी : बनावट औषधांपासून रुग्णांना दूर ठेवून अस्सल औषधे मिळावीत, याकरिता आता देशात सर्वाधिक वापराच्या 300 औषधांच्या ब्रँडस्वर त्याची सत्यता पटण्यासाठी त्याच्या वेस्टनावर क्यूआर कोड समाविष्ट करण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने घेतला आहे. याविषयी मंत्रालयाने 14 जून रोजी जाहीर प्रकटीकरणाचा एक मसुदा प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार औषधे निर्मात्यांवर औषधाच्या बाटली वा गोळ्यांच्या पाकिटासह बाहेरील वेस्टनावरही क्यूआर कोड चिकटविण्याचे बंधनकारक केले आहे. या क्यूआर कोडची माहिती मोबाईलवरील अ‍ॅपआधारे रुग्णांना उपलब्ध होईल, अशी सोय करण्यात येणार आहे.

केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने औषधे नियम 1945 मध्ये दुरुस्ती केली आहे. या दुरुस्तीपूर्वी आरोग्य मंत्रालयाने केंद्र सरकारच्या औषध निर्माण विभागाकडे ज्या औषधांवर क्यूआर कोड आवश्यक आहे, अशा 300 औषधांची यादी तयार करण्याची सूचना केली होती. यानुसार केंद्रीय औषधे मूल्य प्राधिकरणाने (एनपीपीए) या औषधांची यादी तयार केली आहे. संबंधित औषधांच्या यापुढील उत्पादनावर आता क्यूआर कोड उपलब्ध होईल.

मोबाईलवरील अ‍ॅपच्या माध्यमातून रुग्णांना आता क्यूआर कोडमधील माहिती कळू शकेल. यामध्ये औषधाचे जेनरिक नाव, त्याच्या ब्रँडचे नाव, निर्मात्याचे नाव व पत्ता, बॅच नंबर, औषध तयार केल्याची तारीख, मुदतबाह्य ठरण्याची तारीख शिवाय, उत्पादकाचा परवाना क्रमांकही समजणार आहे.

Back to top button