अनिल परब यांना ११ वाजता ईडी कार्यालयात हजर राहण्याचे समन्स | पुढारी

अनिल परब यांना ११ वाजता ईडी कार्यालयात हजर राहण्याचे समन्स

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना पुन्हा एकदा चौकशीला हजर राहण्यासाठी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) समन्स बजावले आहे. ईडीने बजावलेल्या समन्सनुसार परब यांना मंगळवारी सकाळी अकरा वाजता ईडी कार्यालयात चौकशीला हजर राहावे लागणार आहे. गेल्या समन्सनुसार चौकशीला गैरहजर राहिलेले परब हे यावेळी चौकशीला हजर राहतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ईडीने मनी लाँडरिंगचा गुन्हा दाखल करून 26 मे रोजी परब यांच्या शासकीय तसेच खासगी निवासस्थाने, कार्यालये आणि अन्य मालमत्ता अशा मुंबई, पुणे आणि रत्नागिरीतील सात ठिकाणी शोध मोहीम राबविली होती. छापेमारीदरम्यान ईडीचे सह-संचालक तासीन सुलतान यांसह अन्य वरिष्ठ अधिकार्‍यांनी अनिल परब यांची सुमारे 12 तास चौकशी करत त्यांच्याकडून काही महत्त्वाची कागदपत्रे आणि दस्तऐवज ताब्यात घेतले होते. त्यानंतर ईडीने परब यांचे निकटवर्तीय असलेल्या शिवसेना विभाग संघटक आणि केबल व्यावसायिक संजय कदम यांच्यासह सदानंद कदम यांना ईडी मुख्यालयात बोलवून चौकशी केली.

ईडीची एका पथकाने रत्नागिरी, खेड, दापोली येथे ठाण मांडून तपास करत दापोलीतील साई रिसॉर्ट संबंधित कागदपत्रे येथील ग्रामपंचायती, अन्य शासकीय कार्यालयातून रितसर अर्ज करून ताब्यात घेतली आहेत. त्याआधारे ईडीच्या अधिकार्‍यांनी याबाबत सखोल तपास करत चौकशी करण्यासाठी अनिल परब यांना समन्स बजावले होते. ईडीने परब यांना 15 जून रोजी सकाळी 11 वाजता हजर राहण्यास सांगितले होते. मात्र परब हे चौकशीला हजर राहिले नाहीत.

परब यांनी वकिलांमार्फत ईडीला पत्र पाठवून चौकशीला हजर राहण्यासाठी वेळ मागितला होता, तर शिर्डी येथे साईंचे दर्शन घेतल्यानंतर प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना मुंबईत परतल्यानंतर ईडी चौकशीला हजर राहणार असल्याचे सांगितले होते. मात्र ते चौकशीला हजर राहिले नाही. त्यामुळे ईडीने त्यांना दुसरे समन्स जारी कर करत मंगळवारी सकाळी चौकशीला बोलावले आहे.
दापोलीत सहा कोटींचे रिसॉर्ट बांधल्याची तक्रार

दापोली येथे 2017 साली 1 कोटीच्या मोबदल्यात एक जमीन खरेदी करण्यात आली होती. या 1 कोटीच्या जमीन व्यवहाराची नोंद 2019 मध्ये करण्यात आली. पुढे 2017 ते 2020 या काळात येथे तब्बल 6 कोटी रुपये खर्च करून एक मोठे आलिशान रिसॉर्ट बनवले गेले. अनिल परब यांच्या नावाने खरेदी झालेली ही जमीन रिसॉर्ट पूर्ण झाल्यावर अनिल परब यांचे निकटवर्तीय आणि केबल व्यावसायिक संजय कदम यांना विकण्यात आली. परंतु, फक्त स्टॅम्प ड्युटी भरली गेल्याचे तपासात समोर आले असून त्यामुळेच अनिल परब हे तपास यंत्रणांच्या रडारवर आले आहेत.

ईडीने गेल्यावर्षीच्या जुलै महिन्यात पहिल्यांदा मंत्री अनिल परब यांना चौकशीला हजर राहण्यासाठी नोटीस बजावली होती. त्यानंतर ईडीने 30 ऑगस्ट रोजी तीन ठिकाणी छापेमारी केली. यात परबांचे निकटवर्तीय मानले जाणारे प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) बजरंग खरमाटे यांच्या नागपूर येथील घरावर छापेमारी करून काही कागदपत्रे आणि महत्त्वाचे दस्तऐवज ताब्यात घेतले होते.

मंत्री अनिल परब यांनी पहिल्या समन्सनंतर चौकशीला हजर न राहता ईडीकडे वेळ मागितला होता. त्यानंतर ईडीने खरमाटे यांच्यासह वाहन निरीक्षक गजेंद्र पाटील यांचीही चौकशी करून त्यांचा जबाब नोंदविला. पुढे ईडीने अनिल परब यांना पुन्हा समन्स बजावून 28 सप्टेंबर रोजी ईडीच्या मुंबईतील कार्यालयात चौकशीला हजर राहण्यास सांगितले. त्यानुसार अनिल परब हे ईडी कार्यालयात दाखल झाले. ईडीच्या अधिकार्‍यांनी त्यांच्याकडे सात तास चौकशी केली होती.

Back to top button