पुणे : पुढारी वृत्तसेवा: पोलिसांकडून चौकाच्या कोपर्यात उभे राहून सुरू असलेली दंडवसुली थांबली खरी; मात्र वाहतुकीचे नियम मोडण्याचे प्रकार वाढले असल्याचे दै. 'पुढारी'ने नुकत्याच केलेल्या पाहणीत निदर्शनास आले आहे. चौकात उभ्या असलेल्या वाहतूक पोलिसांसमोरच वाहनचालक नियमांना तिलांजली देत होते. सायंकाळी काही ठिकाणी पोलिस उपस्थित होतेे,
तर काही ठिकाणी ते आढळले नाहीत. त्यामुळे वाहनचालकांकडून सर्रास नियमांची पायमल्ली होत असल्याचे दिसून आले. ज्या चौकात पोलिस होते, त्या चौकात पोलिस केवळ दिलेल्या आदेशाप्रमाणे वाहतूक नियमन करीत असल्याचे दिसले. वाहतूक पोलिसांकडून वाहतूक नियमन सोडून केवळ कारवाईचा बडगा उगारला जात होता. त्याची पोलिस आयुक्तांनी दखल घेऊन केवळ वाहतूक नियमावर भर देण्याच्या सूचना केल्यानंतर परिस्थितीत बदल झाला आहे.
सायंकाळी पाच वाजताची वेळ… बाजीराव रस्त्यावरून वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात होती. पण, या गर्दीत वाहतुकीचे नियम मोडणार्या वाहनचालकांची कमतरताही नव्हती. चौकात वाहतूक पोलिस असूनसुद्धा नियम मोडणारे वाहनचालक पाहायला मिळाले अन् त्यामुळे येथे वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. बाजीराव रस्त्यावरील अभिनव कला महाविद्यालय चौकात गुरुवारी (दि. 16) वाहतूक पोलिस असतानाही नियम मोडणारेही कमी नव्हते.
सिग्नल लागल्यावर झेब्रा क्रॉसिंगच्या पुढे थांबणारे रिक्षाचालक, विरुद्ध दिशेने दुचाकी वाहने नेणारे दुचाकीस्वार अन् सिग्नल तोडणारे चारचाकी चालक पाहायला मिळाले. एका कोपर्यात उभे राहून वाहतूक पोलिस सेवा बजावताना दिसले खरे; पण नियम मोडणार्यांवर त्यांचे अजिबात लक्ष नव्हते. टिळक रस्त्याकडे जाणारा सिग्नल लागूनही सिग्नल तोडणार्यांची कमतरता नव्हती. या चौकात सिग्नल मोडणार्यांची संख्या अधिक होती.
अभिनव चौकातून शनिवार चौकाकडे जाताना प्रत्येक गल्लीतून विरुद्ध दिशेने वाहन नेणारेही नियम मोडताना पाहायला मिळाले. टेलिफोन एक्सचेंजजवळील चौक असो वा राजा दिनकर केळकर संग्रहालयाजवळील चौक, येथून विरुद्ध दिशेने वाहन नेण्यास मनाई असताना वाहनचालक सर्रासपणे वाहन नेताना दिसून आले. वाहनांच्या रांगा लागल्या होत्या आणि त्यातून विरुद्ध दिशेने वाहन नेणार्या चालकांमुळे बाजीराव रस्त्यावरील वाहतूक कोंडीत अधिक भर पडत होती.
शनिपार चौकात तर वाहतूक कोंडी झाली होती. येथे वाहतूक पोलिस असूनही सिग्नल तोडणारे वाहनचालकच जास्त होते. झेब्रा क्रॉसिंगच्या पुढे थांबणारे वाहनचालक असो, ट्रिपल सीट जाणारे वाहनचालक येथे दिसले. आप्पा बळवंत चौकातही हीच परिस्थिती पाहायला मिळाली. येथे वाहतूक पोलिस असूनही अनेक वाहनचालक नियम मोडताना दिसले, तर काही वाहनचालक नियमांचे पालन करताना दिसत होते.
स्वारगेट चौकात सिग्नलकडे दुर्लक्ष
स्वारगेट चौकात पाहणी केली असता येथे पूर्णत: बेशिस्त पाहायला मिळाली. वाहतूक पोलिस असूनही त्यांना न जुमानता अनेक रिक्षाचालकांकडून वाहतूक नियमांची ऐशीतैशी केली जात होती. या वेळी अनेक वाहनचालक सर्रासपणे सिग्नल तोडताना पाहायला मिळाले. रिक्षा, पीएमपी बस कोणाचाही धाक नसल्यामुळे रस्त्यातच थांबून प्रवासी भरत, उतरवत होते. येथून अनेक तरुण वाहतूक पोलिसांसमोरच ट्रिपल सीट, वाहन चालवताना मोबाईलवर बिनधास्त बोलत जात होते. एसटी तसेच पीएमपी बसचे चालकसुध्दा सिग्नलचे पालन करीत नव्हते.
बेलबाग चौक, गोटीराम भैया चौक,
कस्तुरे चौकात वाहतूक कोंडी नित्याचीच
बेलबाग चौकात कर्मचार्यांअभावी हीच परिस्थिती दिसली. गोटीराम भैया चौकातही एरवी वाहतूक पोलिसांचा जथ्था दंडवसुली करताना दिसत असे. मात्र, या दोन्ही चौकांत सध्याच्या घडीला एकही कर्मचारी वाहतुकीचे नियोजन अथवा वाहनचालकांना शिस्तीचे धडे देताना दिसून आला नाही. नजीकच मंडई परिसरात मेट्रोचे काम सुरू असल्याने एक बाजू बंद आहे.
त्यामुळे या ठिकाणी वाहनचालक कशीही वाहने लावून निघून जातात, तसेच काही आहे तेथेच वाहन उभे करीत असल्याने हुतात्मा चौकापासून ते गोटीराम भैया चौकापर्यंत वाहतूक कोंडी नित्याचीच असल्याचे पाहायला मिळाले. पोलिस कर्मचारी नसल्यामुळे कै. धोंडीबा अण्णा मिसाळ चौकातून वाहने विरुद्ध दिशेने येऊन गाडीखानानजीकच्या रस्त्यावरून कस्तुरे चौक, शुक्रवार पेठेकडे जाताना दिसली.
मुळात मंडई परिसरात मेट्रोचे काम सुरू असल्याने परिसरात वाहतूक कोंडी वारंवार होते. त्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी वाहतूक कर्मचारी असणे गरजेचे आहे. मात्र, सध्यातरी हे काम महामेट्रोचे कर्मचारी करताना दिसून येतात. त्यांना नागरिक दाद देत नसल्याने परिसरात दुहेरी पार्किंग, वाहने रस्त्यालगत उभे करण्याच्या प्रकारामुळे महत्त्वाच्या वेळेमध्ये या ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो.
हुतात्मा चौकात पादचार्यांना त्रास
छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील दगडूशेठ मंदिरालगतच्या हुतात्मा चौकात अन्य वेळी रस्त्याच्या दोनही बाजूने सहा ते आठ पोलिस दंडवसुली करताना दिसत. सध्या मात्र या महत्त्वाच्या चौकात अवघ्या एका पोलिसामार्फत वाहतुकीचे नियमन सुरू आहे. लाल महालाकडून स्वारगेटच्या दिशेने जाणार्या रस्त्यावरील चौकात झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे नसल्याने वाहनचालकांना वाहन कोठे थांबवावे, याचा अंदाजच येत नाही. त्यामुळे पादचार्यांना रस्ता ओलांडताना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे दिसून आले.
शाहीर अमर शेख चौकात नियमांची ऐशीतैशी
गुरुवारी सायंकाळी 4.30 च्या सुमारास शाहीर अमर शेख चौक येथे पाहणी केली असता वाहनचालक सर्रासपणे नियमांची ऐशीतैशी करताना पाहायला मिळाले. तरुणाई सिग्नलचे पालन न करताच ट्रिपल सीट फिरत होती. कशाचाही धाक नसल्याप्रमाणे तरुणवर्ग चौकातून भरधाव वाहने चालवताना पाहायला मिळाला. सरकारी वाहनांचे चालकदेखील नियमांचे पालन करीत नसल्याचे दिसले. सरकारी चारचाकी वाहने तर थेट झेब्रा क्रॉसिंगच्या पुढे येऊन थांबली होती. अनेक वाहनचालक सिग्नल पाळत नव्हते. सर्रासपणे झेब्रा क्रॉसिंगच्या पुढे वाहने थांबवत होते. येथे झालेल्या कोंडीत एक रुग्णवाहिका अडकल्याचे या वेळी पाहायला मिळाले.
गोळीबार मैदान चौकात
सिग्नलकडे दुर्लक्ष, वाहतूकही बेशिस्त
शहरातील गजबजलेल्या चौकापैकी एक असलेल्या गोळीबार मैदानाचा चौक हा रहदारीचा चौक आहे. गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास या चौकाची पाहणी केली असता येथे वाहतुकीचे नियमन करण्यासाठी कोणताही वाहतूक पोलिस कर्मचारी नव्हता. मात्र, येथील सिग्नल चालू असतानाही वाहनचालक कशाही पध्दतीने गाड्या चालवताना दिसले. सिग्नल सुटण्याअगोदरच गाड्या कशाही पध्दतीने उलट्या दिशेने चालविल्याचा प्रकार दिसून आला. या चौकातून स्वारगेटकडून येणार्या गाड्या हडपसर, स्टेशन तसेच लुल्लानगर चौकाकडे जात होत्या. तसेच हडपसरच्या दिशेने गाड्या स्वारगेट, स्टेशन आणि लुल्लानगरकडे जातात. परंतु, स्वारगेटकडून लुल्लानगर चौकाकडे जाताना चालकांकडून बेशिस्तीने वाहने चालवली जात असल्याचे पाहण्यास मिळाले.
हेही वाचा