सांगली : मोहन यादव
राज्यात गेल्या तीन वर्षांत सरासरीपेक्षा जादा पाऊस पडला आहे. हा पाऊस जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात पडला. जून महिन्यात पाऊस ओढ देत आहे, तर पावसाळा ऑक्टोंबर-नोव्हेंबरपर्यंत लांबत चालला आहे. यंदाही अशीच परिस्थिती असण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. कोयनासह अन्य धरणांतून पाणी सोडण्याचे योग्य नियोजन न केल्यास महापुराचा धोका आहे.
जागतिक तापमान वाढीचा परिणाम सर्वदूर होत आहे. याचा मोठा फटका महाराष्ट्रालाही बसत आहे. मागील काही वर्षांपासून राज्यात नैसर्गिक संकटांची तीव्रता व वारंवारता वाढली आहे. वादळे, विजा पडणे, महापूर, ढगफुटी, डोंगर रांगा कोसळणे, रस्ते खचणे हे प्रकार वाढले आहेत. याला कारणीभूत असणारा पाऊस महाराष्ट्रातील अनेक भागात अनियमित पण प्रचंड प्रमाणात कोसळत आहे. प्रामुख्याने कोकण, पुणे व नागपूर विभागात याची तीव्रता अधिक दिसत आहे.
सन 2018 मध्ये राज्यात पावसाचे प्रमाण कमी होते. पण 2019 पासून सरासरीपेक्षा जादा पाऊस पडत आहे. जून महिन्यात पहिल्या पंधरवड्यात मान्सून ओढ देताना दिसत आहे. तर जनूच्या शेवटच्या आठवड्यापासून पावसाला सुरुवात होत आहे. जुलै, ऑगस्ट महिन्यात प्रचंड प्रमाणात पाऊस कोसळत आहे. यामुळे महापूर येऊन पश्चिम महाराष्ट्राचे प्रचंड नुकसान होत आहे.
प्रामुख्याने सांगली, कोल्हापूर जिल्ह्यास मोठा फटका बसत आहे. तसेच सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यातही 'बरसात' थांबताना दिसत नाही. 2021 मध्ये अगदी नोव्हेंबरपर्यंत पाऊस पडला. काही जिल्ह्यात डिसेंबरमध्येही मध्यम स्वरुपाची बरसात पाहण्यास मिळाली. यात शेतीचे मोठे नुकसान झाले.
यंदाही परिस्थिती अशीच राहणार असे दिसत आहे. हवामान खात्याने व्यक्त केलेले सर्व अंदाज फोल ठरवित मान्सून लांबला आहे. जून महिन्याची 20 तारीख उजाडली तरी महाराष्ट्रात दूर कोकणातही मान्सूनचे आगमन झालेले नाही. मात्र पुढील दोन-तीन महिने पाऊस धो-धो कोसळण्याची शक्यता अनेक हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. तसेच अनेक ठिकाणी ढगफुटी होण्याची व महापूर येण्याचा अंदाजही वर्तविला आहे.
याविषयी हवामान शास्त्रज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे म्हणाले, राज्यात सन 2019 मध्ये दि.15 जुलैला, 2020 मध्ये दि.15 ऑगस्टला, 2021 मध्ये दि. 28 ऑगस्टपासून मान्सून पूर्णपणे सक्रिय झाला होता. यंदाही अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. त्यानुसार सध्या मान्सूनने ओढ दिली आहे. ही ओढ अजून महिनाभर राहिल. त्यानंतर दि. 15 ऑगस्टपासून मान्सून राज्यभर व्यापेल. जुलै महिन्यात काही जिल्ह्यात मान्सूनपूर्व मध्यम पाऊस होईल. त्यामुळे शेतकर्यांनी पेरणीची घाई करू नये. तसेच गत दोन वर्षाप्रमाणे यंदाही ढगफुटी होईल. ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात जोरदार पाऊस पडेल. कोयना व अन्य धरणांतून पाणी सोडण्याचे योग्य नियोजन केले नाही तर सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात महापूर येण्याची शक्यता आहे. तसेच यावर्षीही पावसाळा ऑक्टोंबर, नोव्हेंबरपर्यंत लांबणार आहे.