पिंपरी : कोरोनामुळे आयटीयन्सची परदेशवारी रद्द | पुढारी

पिंपरी : कोरोनामुळे आयटीयन्सची परदेशवारी रद्द

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : आयटी क्षेत्रात प्रतिष्ठेचे समजले जाणारे परदेशी वर्क परमिट अनेक आयटी कंपन्यांनी रद्द केल्याने अनेकांचा भ्रमनिरास झाला आहे. कोरोनाचे कारण देत कंपन्यांनी अनेकांची परदेशवारी रद्द केली आहे. प्रत्येक आयटी कर्मचार्‍याचे एकदा तरी परदेश वर्क परमिटचे स्वप्न असते. परंतु गेल्या दीड ते दोन वर्षांपासून कोरोना निर्बंध आणि वाढणार्‍या रुग्ण संख्येमुळे अनेकांचे स्वप्न भंग होत आहे. त्यामुळे कर्मचार्‍यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे. अनेक आयटी कंपन्यांनी कोरोनाचे कारण देत परदेशवारी नाकारल्या आहेत.

वर्क परमिट काय असते व फायदे काय?
आयटी क्षेत्रात ठराविक पद मिळाल्यानंतर कंपनीच्या परदेशातील कार्यालयात ठराविक महिने काम करण्याची संधी मिळते. यात परदेशातील माहितीचे आदान प्रदान होते. विविध प्रोजेक्ट हाताळायला मिळतात.आऊटसोर्सिंग प्रकल्पात प्रत्यक्ष काम करता येते. भारतात परत आल्यावर प्रकल्प अधिकारी म्हणून बढती मिळू शकते.

नाराजी का ?
परदेशात काम करण्याचा प्रत्यक्ष अनुभव हा आयटी क्षेत्रात खूप महत्वाचा मानला जातो. अनेक कर्मचारी या संधीची वाट बघत असतात; तसेच जेवढे महिने परमिट असते त्या काळातील राहण्याचा सर्व खर्च कंपनी करते. देशात परत आल्यावर कंपनीत बढती लवकर मिळते. त्यामुळे अनेक कर्मचारी या संधीची वाट बघत असतात; परंतु कोरोनाचे कारण देत अनेक कंपन्यांनी वर्क परमिट होणार नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे अनेकांचे स्वप्न भंगले आहे.

आयटी क्षेत्रात ठराविक वयानंतर काम करता येत नाही. त्यामुळे पुढच्या पदावर काम करण्यासाठी मिळेल ती संधी स्वीकारावी लागते. त्यात वर्क परमिट रद्द केल्याने अनेक बढत्या रद्द होणार आहेत.
-प्रथमेश भंडारी, आयटीयन

कोरोनाचे कारण देत कंपनीने वर्क परमिट नाकारले आहे. परदेशात रुग्णांची संख्या वाढत आहे, हे खरे आहे. परंतु किमान बढत्या होण्यासाठी तरी आम्हाला प्रोजेक्टवर काम करू देणे गरजेचे आहे.
-अनिकेत देसाई, आयटीयन

Back to top button