युरियाच्या औद्योगिक वापरात दोषींवर गुन्हे; केंद्राच्या आदेशान्वये कृषी विभागाकडून तपासणी सुरू | पुढारी

युरियाच्या औद्योगिक वापरात दोषींवर गुन्हे; केंद्राच्या आदेशान्वये कृषी विभागाकडून तपासणी सुरू

पुणे, पुढारी वृत्तसेवा: युरिया खत शेतीव्यतिरिक्त इतर औद्योगिक कामासाठी अनधिकृतपणे वापरले जात असून, त्याची कसून चौकशी करून दोषींवर कडक कारवाईच्या सूचना केंद्र सरकारने दिलेल्या आहेत. त्यानुसार रत्नागिरी, सोलापूर आणि पालघर जिल्ह्यांतील निविष्ठाधारक दोषींवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती कृषी आयुक्तालयातून देण्यात आली.

कृषी विभागाकडून अनुदानित युरिया खताचा अनधिकृत वापर होऊ नये यासाठी जिल्हानिहाय निविष्ठाधारकांच्या तपासणीचे काम सुरू झाले असून कलर, डाईज, वस्त्रोद्योग, बिअर इत्यादी उत्पादन कंपन्यांमध्ये युरियाचा वापर होत असल्याचे समजते. रासायनिक खत नियंत्रण आदेशामधील तरतुदींच्या अनुषंगाने कृषी सेवा केंद्रांच्या तपासणीची मोहीम खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर आणि युरियाच्या अनधिकृत वापराबाबत सुरू करण्यात आली आहे.

खतांचा परवाना घेणे, परवानामध्ये साठवणूक केंद्र समाविष्ट असणे, रासायनिक खत युरियाची आवक, त्याच्या साठा पुस्तकातील नोंदी, विक्री, विक्रीबाबतची बिले तपासणी, परवाना अधिकार्‍यांना पाठविण्यात येणारे मासिक अहवाल, जास्त खत खरेदी करणार्‍या शेतकर्‍यांच्या शेतावर जाऊन चौकशी करणे, परिसरातील रिकामी गोदामे तपासणे, वाहतूक करणारी वाहने तपासणी इत्यादी बाबींवर तपासणी पथकाने लक्ष केंद्रित केल्याचे सांगण्यात आले.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे मंगळवारी प्रस्थान; राज्यभरातून दिंड्या होऊ लागल्या दाखल

खरीप हंगामात मान्सूनने सुरुवातीपासूनच पाठ फिरविल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. शिवाय पेरण्या नसताना युरियाचा होणारा खप, विक्री हासुद्धा चर्चेचा विषय झाल्यामुळे संबंधित भागात कृषी सेवा केंद्रांच्या तपासणीवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. याबाबत प्राप्त माहितीनुसार, शेती वापरासाठीच्या निमकोटेड युरियाच्या 45 किलो गोणीचा भाव 266 रुपये आहे, तर औद्योगिक वापरासाठीच्या युरियाचा दर 700 ते 800 रुपयांइतका आहे. त्यामुळे कृषी अनुदानातील कमी भावातील युरिया खरेदी करून औद्योगिक वापरात नेण्याची एक टोळीच कार्यरत असल्याचे समजते.

पालघरमध्ये रात्री युरिया खत वाहतुकीला मनाई…

पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी जिल्ह्यात 17 जूनपासून संध्याकाळी सहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत युरिया खताची वाहतूक करण्यास मनाई आदेश जारी केला आहे. पालघर जिल्ह्यातील बोईसर, तारापूर, पालघर, वसई व वाडा या भागांत मोठ्या प्रमाणावर औद्योगिक कंपन्या आहेत. त्यापैकी कलर, डाईज, वस्रोद्योग, बिअर इत्यादी कंपन्यांमध्ये युरियाचा वापर होतो. शेतकर्‍यांसाठी अनुदानावर मिळणारे युरिया (निमकोटेड युरिया) या कंपन्यांमध्ये वापरले जात असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये युरिया विक्रीमध्ये दोषी आढळलेल्या निविष्ठा केंद्रांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, काही दुकानांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे. त्यामध्ये रत्नागिरी, सोलापूर आणि पालघरमध्ये कडक कारवाई करण्यात आली आहे. तसेच काही ठिकाणी विक्रीबंदचा आदेश जारी करण्यात आला आहे. काही जिल्ह्यांतील अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.

– दिलीप झेंडे, कृषी संचालक (निविष्ठा व गुणनियंत्रण), कृषी आयुक्तालय, पुणे

खरीप हंगामाच्या अनुषंगाने केलेल्या तपासणीत पुणे जिल्ह्यात 54, नगरमध्ये 63 आणि सोलापूर जिल्ह्यात 61 दुकानांना निविष्ठाविक्रीत दोष सापडल्याने कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे. ज्या शेतकर्‍यांनी पन्नासहून अधिक गोण्या युरियाची खरेदी केली आहे त्यांच्या जमिनीचे क्षेत्र, युरियाचा वापर, खरोखरच त्यांना तेवढी गरज आहे काय, याच्या तपासणीचे काम सुरू असून, अहवालानंतर पुढील कारवाई केली जाईल.

– रफिक नाईकवडी, विभागीय कृषी सहसंचालक, पुणे

हेही वाचा

गिरगावतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; 23 जणांना अटक

नगर : ग्रामीण पोलिस ठाणे इमारत प्रस्ताव अडकला लालफितीत

दोन अल्पवयीन मुलींचे राहुरीमधून अपहरण

Back to top button