संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे मंगळवारी प्रस्थान; राज्यभरातून दिंड्या होऊ लागल्या दाखल

संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे मंगळवारी प्रस्थान; राज्यभरातून दिंड्या होऊ लागल्या दाखल

श्रीकांत बोरावके, आळंदी :

जाता पंढरीसी सुख वाटे जीवा
जाता पंढरीसी सुख वाटे जीवा।
आनंदे केशवा भेटताचि॥
या सुखाची उपमा नाही त्रिभुवनी।
पाहिली शोधुनि अवघी तीर्थे॥

कोरोनामुळे दोन वर्षे पायी वारी झाली. यंदा दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आळंदीतून वैष्णवांची पावले पंढरीकडे मार्गस्थ होणार आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज पायी वारी पालखी सोहळा मंगळवारी (दि. 21) आळंदी येथून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवणार आहे. सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्याच्या विविध भागांतून दिंड्या आळंदीत दाखल होऊ लागल्या आहेत. यामुळे अवघी आळंदी भक्तिमय होऊ लागली आहे.

आळंदीतील धर्मशाळा वारकर्‍यांनी गजबजू लागल्या आहेत. प्रशासनाने देखील जय्यत तयारी केली आहे. दहा हजार भाविकक्षमतेची दर्शनबारी उभारण्यात येत आहे. आळंदीत वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली असून, पासधारक वाहनांना शहरात प्रवेश दिला जात आहे. सोहळ्यात सहभागी होणार्‍या भाविकांनी मास्क वापरावा, असेही आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे.

कोरोना अन् पाऊस लांबल्याने गर्दी घटू शकते

दोन वर्षे पायी वारी झाली नसल्याने यंदाच्या सोहळ्याला मोठ्या संख्येने वारकरी उपस्थित राहणार असल्याची शक्यता व्यक्त होत असून, गर्दीच्या अनुषंगाने प्रशासन व देवस्थानने नियोजन सुरू केले आहे. मात्र, कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने अन् पाऊस लांबल्याने पेरण्या रखडल्याने वारकरीसंख्या घटू शकते, असा अंदाज जाणकार व्यक्त करीत आहेत.

पायी वारी पालखी सोहळ्याचा प्रवास

मंगळवारी (दि. 21) सायंकाळी 4 वाजता श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आळंदी येथून प्रस्थान ठेवेल. रात्री आळंदीतच आजोळघरी दर्शनबारी मंडपात मुक्कामी राहील. बुधवारी (दि. 22) सोहळा सकाळी आळंदीतून मार्गस्थ होईल व सायंकाळी पुण्यात मुक्कामी राहील. गुरुवारी (दि. 23) देखील पालखी पुण्यातच मुक्कामी राहील. शुक्रवार (दि. 24) व शनिवारी (दि. 25) सासवड येथे दोन दिवस पालखी सोहळा मुक्कामी राहील.

त्यानंतर रविवारी (दि. 26) जेजुरी, सोमवारी (दि. 27) वाल्हे, मंगळवारी (दि. 28) व बुधवारी (दि. 29) लोणंद येथे दोन दिवस मुक्कामी राहील. त्यानंतर गुरुवारी (दि. 30) तरडगाव, शुक्रवारी (दि. 1 जुलै) व शनिवारी (दि. 2) फलटण येथे दोन दिवस पालखी सोहळ्याचा मुक्काम असेल. रविवारी (दि. 3) बरड, सोमवारी (दि. 4) नातेपुते, मंगळवारी (दि. 5) माळशिरस, बुधवारी (दि. 6) वेळापूर, गुरुवारी (दि. 7) भंडीशेगाव, शुक्रवारी (दि. 8) वाखरी, तर शनिवारी (दि. 9) श्री क्षेत्र पंढरपूर मुक्कामी सोहळा पोहचेल.

रविवारी (दि. 10) आषाढी एकादशीचा महासोहळा होणार आहे. दरम्यान, पालखी सोहळ्यात चांदोबाचा लिंब, बाजीराव विहीर व इसबावी येथे उभे रिंगण, तर पुरंदावडे (सदशिवनगर), पानीव पाटी, ठाकूरबुवा व बाजीराव विहीर येथे अश्वांचे गोल रिंगण होणार आहे. यंदा तिथी वृद्धी झाल्याने लोणंद, फलटण येथे दोन दिवस पालखीचा मुक्काम वाढला आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news