

पुणे : पुढारी वृत्तसेवा: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या दहावीच्या निकालात मातृभाषेतच राज्यातील तब्बल 29 हजार विद्यरार्थ्यांची दांडी गुल झाली आहे. मराठीपेक्षा जास्त निकाल इंग्रजी भाषेचा लागला आहे. त्यामुळे मराठी विषयाची पीछेहाट होत असल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहे. राज्य मंडळाने एकूण 66 विषयांची परीक्षा घेतली.
यातील 24 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे. राज्यात जवळपास 96.94 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, तर केवळ 3.06 टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. परंतु, या नापास झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये मराठी विषयात नापास होणार्या विद्यार्थ्यांची संख्या लक्ष वेधणारी आहे. राज्यात मराठी प्रथम भाषा विषयाच्या परीक्षेला 11 लाख 33 हजार 46 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 11 लाख 20 हजार 28 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील 10 लाख 90 हजार 887 विद्यार्थी पास झाले, तर 29 हजार 141 विद्यार्थी नापास झाले आहेत.
निकालाचा टक्का 97.40 आहे. इंग्रजी प्रथम भाषा विषयाच्या परीक्षेला 3 लाख 44 हजार 861 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 3 लाख 43 हजार 844 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील 3 लाख 39 हजार 858 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, तर केवळ 3 हजार 986 विद्यार्थी नापास झाले आहेत. निकालाचा टक्का 98.84 टक्के आहे.
तर मराठी व्दितीय किंवा तृतीय भाषा विषयाच्या परीक्षेला 3 लाख 99 हजार 659 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 3 लाख 97 हजार 741 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील 3 लाख 90 हजार 279 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, तर 7 हजार 462 विद्यार्थी नापास झाले आहेत. निकालाचा टक्का 98.12 आहे.
इंग्रजी द्वितीय किंवा तृतीय भाषा विषयाच्या परीक्षेला 12 लाख 76 हजार 410 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 12 लाख 61 हजार 426 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील 12 लाख 26 हजार 68 विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर 35 हजार 358 विद्यार्थी नापास झाले. निकालाचा टक्का 97.20 आहे. त्यामुळे मराठी आणि इंग्रजी या विषयांचा तुलनात्मक अभ्यास केला, तर इंग्रजी भाषा अवघड असूनही विद्यार्थ्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण चांगले आहे. मराठी मातृभाषा असूनही विद्यार्थी नापास होण्याचे प्रमाण लक्षवेधक आहे.
मराठीत उपयोजित लेखनात स्वत:चे मत, विचार, कल्पना, अनुभव या आधारे लेखन करायचे असते. याबाबतीत विद्यार्थी कमी पडतात. उपयोजित लेखन 24 मार्कांचे असते, हे एक कारण आहे. इंग्रजी माध्यमातील मुलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या मुलांच्या मराठी विषयाकडे इंग्रजी शाळांचे पूर्ण दुर्लक्ष होत आहे. पालक देखील आमच्या मुलाचे मराठी कच्चे आणि इंग्रजी चांगले असल्याचे अभिमानाने सांगतात. ही मराठी भाषेची शोकांतिका आहे.
डॉ. अ. ल. देशमुख, शिक्षणतज्ज्ञ
राज्यात दहावीत 29 हजार विद्यार्थी मराठीत नापास होणे हे धक्कादायक आहे. यामध्ये मराठी माध्यमाचे विद्यार्थी कमी असून, इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी जास्त असण्याची शक्यता अधिक आहे. तसेच मराठी भाषा सोपी आहे, ही मानसिकतादेखील याला कारणीभूत असण्याची शक्यता आहे.
डॉ. राजेंद्र झुंजारराव, प्राचार्य, मॉडर्न महाविद्यालय
हेही वाचा