वटपौर्णिमेदिवशी तब्बल 15 वर्षांनी परत मिळाले सौभाग्य! | पुढारी

वटपौर्णिमेदिवशी तब्बल 15 वर्षांनी परत मिळाले सौभाग्य!

देवगड ः पुढारी वृत्तसेवा 15 वर्षापूर्वी देवगड पं.स.मधून किरकोळ रजा टाकून गेलेले सूर्यकांत पाटील घरी परतलेच नाहीत. घरातील पत्नी, मुले अन् नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेवूनही ते मिळाले नाहीत. अखेर 15 वर्षांनी नाशिक जिल्ह्यातील निफाड शहरात सूर्यकांत पाटील सापडून आले ते निफाड येथील बाळासाहेब पाखरे आणि विजय खालकर या शिक्षकांमुळे. अखेर त्यांच्या प्रयत्नांमुळेच वटपौर्णिमेदिवशी एका पत्नीला आपले सौभाग्य 15 वर्षांनी मिळाले तर दोन्ही मुलांना त्यांचे बाबा मिळाले.

देवगड पं. स. मध्ये वरिष्ठ सहाय्यक म्हणून सेवेत असलेले सूर्यकांत मनोहर पाटील हे 3 ऑगस्ट 2006 रोजी किरकोळ रजा टाकून बाहेर पडले. मात्र तेव्हा पूसन ते घरी परतलेच नाहीत. घरातील मंडळींनी सर्वत्र शोध घेवूनही ते सापडले नाहीत. याबाबत 6 ऑगस्ट 2006 रोजी त्यांची पत्नी उमा सूर्यकांत पाटील यांनी पती बेपत्ता झाल्याची तक्रार देवगड पोलिस स्थानकात दिली होती. दरम्यानच्या कालावधीत त्यांची पत्नीही सेवानिवृत्त झाली. मुले मोठी झाली अन् त्यांच्या मार्गाला लागली. मात्र 10 जून रोजी त्यांच्या मुलाला एक फोन येतो.तुमचे पप्पा तुमच्याशी बोलू इच्छितात.. हे ऐकून मुलांचा प्रथम विश्वासच बसला नाही. पण नियतीने घडवून आणलेला हा सुखद अनुभव मुंबई आणि गोवा स्थित त्यांच्या मुलांना आला आणि त्यांनी थेट निफाड गाठले.

एखाद्या चित्रपटातील कथानकाला शोभेल अशी ही घटना आहे. 3 जून रोजी निफाड येथील प्राथमिक शिक्षक बाळासाहेब पाखरे हे नाशिक रोडने जात असताना त्यांना विमनस्क स्थितीतील श्री. पाटील दिसले. त्यांनी श्री.पाटील यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी आपल्याबद्दल थोडी माहिती दिली. श्री.पाखरे यांनी ही माहिती त्यांचे मित्र विषयतज्ज्ञ विजय खालकर यांना सांगीतले. श्री.खालकर यांनी रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही मित्रपरिवाराशी संपर्क करत श्री.पाटील यांच्या कुटुंबाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.परंतु देवगड परिसरात पाटील कुटुंबियांपैकी कोणीही राहत नसल्याने त्यांचा संपर्क होत नव्हता.अखेर श्री. खालकर यांनी मित्रांशी संपर्क साधून देवगड पं.स.शिक्षण विभागाशी संपर्क केला आणी तेथिल अधिकार्‍यांशी संपर्क साधून ते श्री.पाटील यांच्या कुटुंबियांपर्यंत पोहचले.

या सर्व कुटुंबाची माहिती घेणे व श्री.पाटील यांना घरी जाण्यासाठी तयार करणे ही दोन्ही कामे एकाचवेळी श्री.खालकर व श्री.पाखरे करत होते.अखेर अथक प्रयत्नानी श्री. पाटील यांच्या मुलीचा मोबाईल नंबर या दोघांना मिळाला. त्या नंतर 10 जून रोजी श्री. खालकर यांनी फोनवरून श्री.पाटील यांच्या मुलीशी संपर्क साधला. श्री.पाखरे व श्री.खालकर यांनी त्यांचा फोटो दाखवित फोनवरून बोलणे तसेच व्हॉटसअप कॉलच्या माध्यमातून श्री.पाटील यांची ओळख पटवून दिली. ही ओळख पटविण्यासाठी देवगड पं.स.मधील काही कर्मचारी, अधिकारी यांचीही मदत घेण्यात आली.

हे सर्व घडल्यानंतर 13 जूनला श्री.पाटील यांचे कुटुंबिय त्यांना घेण्यासाठी नाशिककडे निघाले. दरम्यानच्या काळात सूर्यकांत पाटील यांची सर्व व्यवस्था श्री खालकर व श्री.पाखरे यांचे कुटुंबिय व मित्रपरिवार पाहत होते.अखेर पाखरे यांचे कुटुंबिय मंगळवारी 14 जून रोजी निफाड येथे पोहचले. वडिलांना पाहताच मुलांचा स्वत:चा डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता. सूर्यकांत पाटील व त्यांचे कुटुंबिय तब्बल 15 वर्षे 10 महिने 11 दिवसांनी भेटले. पती- पत्नी व वडील- मुले यांच्यात पुनर्भेट घडवून आणणार्‍या श्री.पाखरे व श्री.खालकर यांचे व त्यांचे कुटुंब, मित्रपरिवार यांचे आभार मानून वडिलांना घेवून ते घरी आले.

देवगड पोलिस स्थानकात दिली होती बेपत्ता झाल्याची खबर

देवगड पं.स.चे वरिष्ठ सहाय्यक सूर्यकांत पाटील हे 3 ऑगस्ट 2006 रोजी किरकोळ रजा टाकून निघाले. मात्र ते घरी न गेल्याने कुटुंबियांनी त्यांचा शोध घेतला. मात्र ते मिळाले नाहीत म्हणून 6 ऑगस्ट 2006 रोजी त्यांची पत्नी उमा सूर्यकांत पाटील यांनी बेपत्ता झाल्याची खबर देवगड पोलिस स्थानकात दिल्याची नोंद आहे, अशी माहिती देवगड पोलिस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी दिली.

Back to top button