भीमेच्या पाणी पातळीत झपाट्याने घट; दौंड तालुक्यातील चित्र | पुढारी

भीमेच्या पाणी पातळीत झपाट्याने घट; दौंड तालुक्यातील चित्र

नानगाव, पुढारी वृत्तसेवा: पावसाळा तोंडावर आल्यावर भीमा नदीवर असलेल्या बंधार्‍यांचे ढापे काढले जातात. परिणामी या काळात नदीतील पाण्याचा साठा झपाट्याने कमी होत असतो. सध्या भीमा नदीवरील बंधार्‍यांचे ढापे काढल्याने दिवसेंदिवस नदीतील पाण्याचा साठा कमी होताना दिसून येत आहे.

दौंड तालुक्याला वरदान ठरलेल्या भीमा नदीत यंदाच्या वर्षी ऐन उन्हाळ्यात देखील पाण्याची टंचाई भासली नाही. बंधार्‍यांमुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर व काठोकाठ पाण्याचा साठा शिल्लक होता. मात्र, सध्या पावसाळा सुरू होत असल्याने बंधार्‍यांची ढापे काढण्यात येत आहेत. त्यामुळे नदीपात्रातील पाण्याचा साठा कमी- कमी होत असल्याची स्थिती आहे.

राजगडाच्या तीन माच्या, धडकी भरविणारा बालेकिल्ला

काही भागात पाऊस नसल्याने अशा ठिकाणी उसाच्या लागवडी नदीच्या पाण्यावर होत आहेत, त्यामुळे शेतकरी विद्युत मोटारींच्या सहाय्याने शेतापर्यंत पाणी नेऊन उसाच्या लागणी करत आहेत. सतत विद्युत मोटारी सुरू असल्याने पाण्याचा साठा झपाट्याने कमी होत आहे. एकीकडे नदीतील पाण्याची पातळी कमी होत आहे तर दुसरीकडे पाऊस देखील ओढ घेत आहे.

त्यामुळे नदीपात्रातील पाण्याशिवाय शेतीला पर्याय नाही, परंतु बंधार्‍याच्या वरच्या बाजूच्या नदीपात्रातील पाण्याचा साठा झपाट्याने कमी होताना दिसत आहे. सध्याची नदीतील झपाट्याने कमी होणारी पाण्याची पातळी आणि दुसरीकडे जून महिना निम्मा संपून देखील डोंगर भागात व धरण क्षेत्रात पावसाने फिरवलेली पाठ यामुळे पुढील काळात भीमेतील वरच्या बाजूला असणार्‍या नदीपात्रात पाण्याची पातळी कमी होऊन शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार असल्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा

म्हणे, राजेंविरोधात तिसरा पर्याय देणार ! आ. शशिकांत शिंदेंनी बैठक घेतल्याची चर्चा

कोल्हापूर महापालिका : 23 जूनला होणार मतदार यादी प्रसिद्ध

नातेवाईकांसमोर पतीला नपुंसक म्हणणे ही मानसिक क्रूरताच; हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्वाळा

Back to top button