बेकायदा विक्रीसाठीचे 92 लाखांचे मद्य जप्त | पुढारी

बेकायदा विक्रीसाठीचे 92 लाखांचे मद्य जप्त

पुणे, पुढारी वृत्तसेवा: पर्यटकांसाठी अगदी कमी किमतीत मिळणारी दारू राज्याबाहेर विक्रीसाठी नेणार्‍या ट्रक चालकाला उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने पकडले. त्यात सुमारे 92 लाखांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला. पुणे उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकपदी मुंबईहून महिन्याभरापूर्वी रुजू झालेले चरणसिंग राजपूत यांनी त्यांच्या कारवाईचा धडाका पुण्यातही सुरू केला आहे.

खबर्‍याकडून मिळालेल्या माहितीनुसार, अधीक्षक राजपूत यांनी निरा गावाच्या हद्दीत निरा-लोणंद रस्त्यावर सापळा रचून गोव्यातून तस्करी करून विक्रीसाठी येणार्‍या मद्याचा ट्रक पकडला. सुरुवातीला ट्रक चालकाने या पथकाला हुलकावणी देत दुसर्‍या मार्गाने पळ काढला. भरारी पथकाला याची जाणीव असल्याने त्यांनी त्या मार्गावरदेखील एक पथक तैनात करून त्या ट्रकचा पाठलाग केला.

शिक्षण : शोधा योग्य संधी, योग्य पर्याय!

दोन किलोमीटरच्या पाठलागानंतर तो ट्रक निरा गावाजवळील एका हॉटेलसमोर अडवला. ट्रक चालकाने आधी उडवाउडवीची उत्तरे देत वाहनात घराचे सामान असल्याचे सांगितले. पथकाला शंका आल्यानंतर अधीक्षकांच्या आदेशानुसार त्या ट्रकची तपासणी केली असता त्यात गोवा राज्याबाहेर विकण्यासाठी बंदी असलेले मद्य आढळले. त्या मद्याबाबत बिल व कागदपत्रे मागितली असता चालकाने ट्रक सोडून पळण्याचा प्रयत्न केला.

ही कारवाई पूर्ण करण्यात व्यग्र असतानाच खबर्‍याकडून मिळालेल्या माहितीनुसार, अहमदनगर रस्त्यावर अशाच प्रकारचा एक ट्रक पकडला. या कारवाईतदेखील सुमारे 92 लाखांचाच मद्यसाठा मिळाला असून, ही कारवाई अहमदनगर उत्पादन शुल्क विभागाकडे वर्ग करण्यात आली आहे.

राजपूत रुजू झाल्यानंतर या पूर्वी शिंदेवाडी जवळ केलेल्या कारवाईत 87 लाखांचा, तर अन्य दुसर्‍या एका कारवाईत 50 लाखांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. ट्रकचालक प्रवीण परमेश्वर पवार (वय 23, तांबोळे, ता. मोहोळ, जि. सोलापूर) याला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पुणे विभागाचे उपायुक्त अनिल चासकर यांच्या निर्देशानुसार अधीक्षक चरणसिंग राजपूत, उपअधीक्षक संजय पाटील, युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथक क्रमांक 2 ने केली.

हेही वाचा

माउलींच्या रथाला जुंपली सोन्या- माऊली बैलजोडी; रथ ओढत केली प्रस्थान सोहळ्याची जय्यत तयारी

प्रहार संघटना घालणार आज पालकमंत्र्यांचे श्राद्ध

अनुसूचित जाती समितीचा आ. प्रणिती शिंदे यांनी घेतला आढावा

Back to top button