माउलींच्या रथाला जुंपली सोन्या- माऊली बैलजोडी; रथ ओढत केली प्रस्थान सोहळ्याची जय्यत तयारी | पुढारी

माउलींच्या रथाला जुंपली सोन्या- माऊली बैलजोडी; रथ ओढत केली प्रस्थान सोहळ्याची जय्यत तयारी

श्रीकांत बोरावके

आळंदी : संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी पायी वारी पालखी प्रस्थान सोहळ्याची जय्यत तयारी आळंदीत (ता. खेड) सुरू आहे. गुरुवारी (दि. 16) माउलींच्या रथाला बैलजोडी जुंपून रथ ओढण्याचा सराव करण्यात आला. बैलजोडीचा मान मिळालेले मानकरी पांडुरंग वरखडे, तानाजी वरखडे, कृष्णा वरखडे, वैभव वरखडे यांची सोन्या – माऊली या बैलजोडीने गुरुवारी आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी रथ ओढण्याचा सराव केला. दि. 21 जून रोजी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रस्थान ठेवणार आहे.

दोन वर्षे वारी न झाल्याने या रथाच्या डागडुजीची कामे सुरू होती. रथाच्या विविध कामांमुळे हा रथ उजळून निघाला आहे. या कामामुळे रथाच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे. रथाचा सराव पाहून काही किरकोळ दुरुस्तीची कामे कारागीर संस्थांनच्या भक्त निवासामध्ये करणार आहेत. दरम्यान, सोहळ्यासाठी आळंदी सज्ज होत असून, फिरती शौचालये, मोबाईल टॉयलेट शहरात विविध ठिकाणी उभारली जात आहेत.

प्रमुख चौकात पोलिस टेहळणी नाके उभारण्यात आले आहेत. पालिकेकडून विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. काही ठिकाणी फुटपाथ दुरुस्ती, वृक्षलागवड, स्वच्छतेची कामे करण्यात येत आहेत. प्रस्थान सोहळा पाच दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे संस्थान व नगरपरिषदेच्याच्या वतीने पालखी सोहळ्याची जय्यत तयारी केली जात आहे.

हेही वाचा

शिक्षण : शोधा योग्य संधी, योग्य पर्याय!

ठाणे : किडनीदात्याला ठरवले जाते रुग्णाचा नातलग

अनुसूचित जाती समितीचा आ. प्रणिती शिंदे यांनी घेतला आढावा

Back to top button