पुणे, पुढारी वृत्तसेवा: 'माणसाने आपले सौैंदर्य जपले पाहिजे. असे झाले तर तुम्ही प्रत्येक परिस्थितीत आनंदी व्हाल. या जीवसृष्टीला फुलांसारखे सुगंधित करायचे असेल, तर माती संवर्धनासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची प्रतिज्ञा घ्यावी,' असे विचार आध्यात्मिक गुरू जग्गी वासुदेव यांनी व्यक्त केले.
26 देशांचा दौरा करून आलेल्या सद्गुरूंनी माती संवर्धनाचा जागर करण्यासाठी एमआयटीच्या विश्वशांती घुमट व ग्रंथालयाला भेट दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांशी संवाद साधून पर्यावरणरक्षण व माती संवर्धनाचे आवाहन केले. या वेळी एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर. एम. चिटणीस आणि प्र-कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे उपस्थित होते.
वासुदेव म्हणाले, 'जागतिक तापमानात होणारी वाढ लक्षात घेऊन पर्यावरण संरक्षण आवश्यक आहे. रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीची पोतशक्ती हळूहळू कमी होत आहे. जमिनीची सुपिकता कमी झाल्यामुळे पृथ्वीवर अन्नाचे उत्पादन कमी होईल. त्यामुळे अन्नाची समस्या वाढणार आहे. माती वाचविण्याचे काम आतापासूनच सुरू केले नाही, तर येत्या काही वर्षांत जगावर अन्नांचे संकट ओढवेल.'
डॉ. कराड म्हणाले, 'सद्गुरू जग्गी वासुदेव हे भारतीय आत्मा आहेत. संपूर्ण जगाला माती वाचविण्याचा सार्वत्रिक संदेश देऊन त्यांनी एक नवी क्रांती घडवून आणली आहे. या चळवळीला संस्थेचे विद्यार्थी आणि कर्मचार्यांचा पाठिंबा आहे.' डॉ. मिलिंद पांडे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. डॉ. मंगेश कराड यांनी आभार मानले.
हेही वाचा