पुणे, पुढारी वृत्तसेवा: शहरातील विविध भागांत पाच घरफोड्या झाल्याचे समोर आले आहे. बंद सदनिकेवर डल्ला मारून चोरट्यांनी रोकड व सोन्याचे दागिन्यांची चोरी केली आहे. दत्तवाडी परिसरातील लक्ष्मीनगर सोसायटीतील महादेव वसंत भोसले (वय 42) यांच्या सदनिकेचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. त्यानंतर रोकड, सोने-चांदीचे दागिने असा 1 लाख 4 हजार रुपयांचा किमती ऐवज चोरी केला. ही घटना 13 मे रोजी दुपारी घडली आहे.
भोसले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दत्तवाडी पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. साईनगर हिंगणे खुर्द, सिंहगड रोड येथील सुनील गोपीनाथ गवळी (वय 38) यांचे राहते घर कुलूप लावून बंद असताना, चोरट्यांनी कटरच्या साह्याने ते तोडून आत प्रवेश केला. रोकड, चांदीचे पैंजण असा 4 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरी केला. गवळी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सिंहगड रोड पोलिसांनी विरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच जाधवनगर येथील पांडुरंग गंगाराम भालेकर (वय 66) यांच्या घराचा दरवाजा उचकटून चोरट्यांनी तीन हजारांची रोकड चोरी केली.
ते राहत असेलल्या सोसायटीतील अनंत वणगे यांच्या घराचा कडीकोयंडा उचकटून चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या घरात ऐवज नसल्यामुळे चोरट्यांच्या हाती काही लागले नाही. हडपसर गणेश मंडळाजवळील त्रिमुर्ती सोसायटीत वास्तव्यास असलेले अमोघ प्रमोद रूपनर (वय 27) यांच्या घराचा दरवाजा बंद असताना चोरट्यांनी लॉक तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर सोन्याचे दागिने व रोकड असा 45 हजार रुपयांचा ऐवज चोरी केला.
हेही वाचा