

आळंदी : श्रीकांत बोरावके : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पायी वारी पालखी प्रस्थान सोहळा तोंडावर आला असताना इंद्रायणी नदीच्या प्रदूषणात वाढ झाल्याने चिंता वाढली आहे. अंघोळ तर सोडाच, पण किमान ओंजळीत तरी घेता येईल असेही पाणी शुद्ध राहिले नसल्याने वारकरी नाराजी व्यक्त करीत आहेत. त्यात पाण्याला फेस मोठ्या प्रमाणात येत असून, फेसयुक्त काळसर पाणी वाहू लागल्याने भाविकांना स्नान करण्यापासून वंचित राहावे लागणार आहे.
आळंदी येथील सिद्धबेट बंधार्यात फेसयुक्त रासायनिक पाणी आल्याचे दिसून येत असून, यामुळे बंधारा फेसाळला आहे. सांडव्यावर पांढरा फेस दिसून येत असून, पुढे काळे पाणी वाहत इंद्रायणी घाटावर येत आहे. शिवाय, पात्रात पाणीपातळी देखील कमी झाल्याने टाकून दिले कपडे, कचरा मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.
पात्रात पाणीपातळी वाढली, तरी किमान कचरा वाहून जाणार आहे. मात्र, तूर्तास तरी नदीची प्रदूषित पातळी
वाढली असून, वारीच्या पार्श्वभूमीवर चिंता वाढली आहे. यावर तातडीने उपाययोजना करणे गरजेचे बनले असून, नदीत आंध्रा धरणाचे पाणी सोडण्यात आल्यास किमान स्नान तरी भाविकांना करता येऊ शकणार आहे. यासाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली होणे गरजेचे असणार आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून जलपर्णी काढण्यासाठी डुडुळगाव हद्दीत जेसीबी, पोकलेन मशिनचा वापर करून जलपर्णी पात्रातून बाहेर काढण्यात येत आहे. यात मशिनमुळे पाणी मोठ्या प्रमाणात गढूळ होत आहे. किमान प्रस्थानापर्यंत मशिनचा वापर बंद राहिल्यास पाणी गढूळ होण्याचे प्रमाण कमी होईल.
जूनचा मान्सून आगमनाचा काळ असल्याने सर्वच बंधार्यांचे ढापे काढण्यात येत असतात, ते काम सुरू केलेले नाही. याबरोबरच पंतप्रधान मोदी देहूत येणार असल्याने देहूची इंद्रायणी नदी तुडुंब भरलेली दिसावी, डोह पाहता यावा, यासाठी बंधार्यातून पुढे आळंदीच्या दिशेने पाणी सोडण्यात आले नव्हते, असे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. दोन दिवसांत पाणी सोडण्यात येणार असून, प्रस्थानदिनी आळंदीत नदी तुडुंब असेल, असा विश्वास जलसंपदा विभागाकडून व्यक्त होत आहे.
पाणी सोडण्याबाबत जलसंपदा विभागाला पत्रव्यवहार करण्यात आला असून, दोन दिवसांत पाणी सोडण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे. पात्र स्वच्छ करण्याबाबतदेखील दोन दिवसांत युद्धपातळीवर कारवाई करण्यात येईल. फिरती शौचालये लावण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
– अंकुश जाधव, मुख्याधिकारी, आळंदी नगरपरिषद