निम्म्या शालेय वाहनांची फिटनेस तपासणी नाही; विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर | पुढारी

निम्म्या शालेय वाहनांची फिटनेस तपासणी नाही; विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

पुणे, पुढारी वृत्तसेवा: पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून शहरातील निम्म्या शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्‍या वाहनांची फिटनेस तपासणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. कोरोनामुळे दोन वर्षे बंद असलेल्या शाळा यंदा जूनपासून सुरू झालेल्या आहेत. शहरातील लहान-मोठ्या शाळांमधील हजारो मुलांना पोहोचविण्याचे काम शालेय वाहनांमधून सुरू आहे.

या वाहनांना आरटीओकडून मोटार वाहन कायद्यानुसार काही नियम लागू आहेत. मात्र, शहरातील स्कूल व्हॅन, स्कूल बस, रिक्षाचालकांकडून सर्रासपणे नियमांची ऐशीतैशी केली जात आहे. काही विनापरवाना खासगी वाहनांतूनदेखील शहरात अवैधरीत्या मुलांची वाहतूक सर्रासपणे होत आहे.

पराभवानंतरही दक्षिण आफ्रिकन संघात बदल होणार नाही : बावूमा

परिवहन समिती नावालाच?

मोठमोठ्या शाळांमध्ये शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक व्यवस्थित होत आहे की नाही, यासंदर्भात शालेयस्तरावर परिवहन समिती स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत आणि ते शाळांना बंधनकारक आहेत. काही शाळांकडून अशा समित्या फक्त नावालाच स्थापन करण्यात आल्या आहेत. मुलांच्या सुरक्षिततेवरील कोणतीही उपाययोजना यांच्याकडून केली जात नाही. त्यांची नियोजित बैठक होणे आवश्यक आहे. मात्र, तसे होत नसल्याचे दिसत आहे. तसेच, अनेक स्कूल व्हॅनचालकांनी शाळांशी करार केले नाहीत, पालकांशी बोलून शालेय वाहतूक पुरविली जात आहे.

परवाना नसलेली खासगी वाहने जप्त

करण्याची कारवाई आरटीओकडून केली जाणार आहे. ज्यांच्याकडे परवाना आहे. मात्र, फिटनेस
तपासणी नाही अशा वाहनांचा व चालकाचा परवाना निलंबित केला जाईल. तसेच 14 ते 15 हजारांपर्यंत दंड ठोठावला जाईल.

सीएनजीवरील स्कूल व्हॅन ‘जिवंत बॉम्ब’?

शहरात शालेय वाहतूक पुरविणार्‍या स्कूल व्हॅन सीएनजी गॅसवर धावत आहेत. या गाड्यांची वेळेत फिटनेस तपासणी होणे गरजेचे आहे. मात्र, शाळा सुरू झाल्या तरी 50 टक्के गाड्यांचे पासिंग झालेले नाही. यामुळे या गाड्यांना आगी लागण्याच्या घटना घडण्याची दाट शक्यता आहे.

शालेय वाहतूक करणार्‍या 50 टक्के वाहनांची आतापर्यंत फिटनेस तपासणी झाली आहे. उर्वरित वाहन तपासणीसंदर्भात शालेय वाहतूकदारांची येत्या सोमवारी (दि. 20) आरटीओ कार्यालयात बैठक बोलावली आहे.

– संजय ससाणे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे

हेही वाचा

टी-20 क्रमवारीत ईशान किशन ‘टॉप 10’मध्ये

नागपूर : एका तासात 3331 पुशअप मारून नोंदविला विश्वविक्रम

विजय राऊतसह तिघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

Back to top button