नागपूर : पुढारी वृत्तसेवा; एका तासात तब्बल 3331 पुशअप मारून नागपूरच्या कार्तिकने नवा जागतिक विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. कार्तिक जयस्वाल या 21 वर्षीय तरुणाने एका तासात सर्वाधिक पुशअप मारण्याचा यापूर्वीचा गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड मोडलेला आहे.
डॅनियल स्कालीला टाकले मागे यापूर्वी हा विश्वविक्रम ऑस्ट्रेलियन खेळाडू डॅनियल स्कालीच्या नावावर होता. त्याने याचवर्षी 3182 पुशअपचा विश्वविक्रम नोंदविला होता. मात्र, अवघ्या काही महिन्यांतच कार्तिकने हा विक्रम मोडीत काढून विश्वविक्रमाची नोंद केली आहे. याआधीही कार्तिकने एका मिनिटात सर्वाधिक टाईल्स फोडण्याचा रेकॉर्ड केला होता.कार्तिक जयस्वाल एमएमए फायटर भारत आणि आशिया बुक ऑफ रेकॉर्ड होल्डर फिटनेस खेळाडू आहे. त्याने ऑस्ट्रेलियन खेळाडू डॅनियल स्कालीचा रेकॉर्ड मोडण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची घोषणा केली. तेव्हा डॅनियल स्कालीने हा रेकॉर्ड कुणीही मोडू शकणार नाही, असे आव्हान दिले होते. त्यानंतर कार्तिकने जिद्द आणि परिश्रमाच्या जोरावर एका तासात तब्बल 3331 पुशअप मारून नवा विश्वविक्रम नोंदविला आहे.