

विशाखापट्टणम् : वृत्तसंस्था; भारताविरुद्धच्या तिसर्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी दबावाखाली आल्याने पराभव स्वीकारावा लागला. मात्र, पाच सामन्यांच्या मालिकेतील एका पराभवाने संघाच्या रणनीतीत बदल करणे योग्य ठरणार नाही, असे दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार तेम्बा बावूमा याने म्हटले आहे.
विजयासाठी 180 धावांचे टार्गेट नजरेसमोर ठेवून मैदानात उतरलेल्या द. आफ्रिकेची सुरुवात अत्यंत संथ झाली. पहिल्या तीन षटकांत फलकावर केवळ 15 धावा लागल्या होत्या. या सामन्यात पाहुण्यांना 48 धावांनी पराभव पत्करावा लागल्यानंतर बोलताना बावूमाने सांगितले की, आम्ही नेहमीच पहिल्या दोन षटकांकडे पाहत असतो आणि त्यानंतर डावाला आकार देण्याचा प्रयत्न करत असतो. त्यानंतर प्रमुख खेळाडूंसाठी प्लॅटफॉर्म तयार करत असतो. हीच रणनीती आमच्यासाठी नेहमीच उपयोगी ठरली आहे. मात्र, एका पराभवामुळे ही रणनीती बदलल्यास ते योग्य ठरणार नाही.
माझ्या मते, भारतीय फिरकी गोलंदाजांनी आम्हाला दबावाखाली आणले. हा दबाव आम्ही पेलू शकलो नाही. जसे की, आम्ही पहिल्या दोन सामन्यांत केले होते. मात्र, परिस्थिती फिरकीसाठी अनुकूल होती. असे असले तरी भारतीय फिरकी गोलंदाजांचे कौतुक केलेच पाहिजे, असेही बावूमाने यावेळी सांगितले.
आमच्या डावास सुरुवात होताच भारतीय कर्णधाराने फिरकीला पाचारण केले. याचाच मोठा परिणाम झाला आणि आम्ही पिछाडीवर पडलो. याशिवाय फलंदाजीत आम्ही मोठी भागीदारी करू शकलो नाही. पहिल्या दोन सामन्यांत आम्ही चांगली फलंदाजी केली. मात्र, तिसर्या सामन्यात आम्ही ती करू शकलो नाही, असेही बावूमाने सांगितले.