

पिंपरी, पुढारी वृत्तसेवा: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिकारी व कर्मचारी कसेही ओळखपत्र तयार करून वापरत असल्याने बेशिस्ती वाढली होती. त्याला आळा घालून रोख लावण्यासाठी केवळ अधिकृत व एकसारखी ओळखपत्र बाळगण्याचा नियम करण्यात आला. मात्र, अ, ब, क आणि ड या वर्गानुसार अधिकारी व कर्मचार्यांना ओळखपत्रास वेगवेगळ्या रंगाचे फित (लेस) असल्याने महापालिका वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगली आहे.
पालिकेचे कर्मचारी कोणी कशाही प्रकारे ओळखपत्र लावून पालिका भवन, क्षेत्रीय कार्यालयात व इतर ठिकाणी वावरत होते. त्या बोगस ओळखपत्र तयार केल्याच्या तक्रारी पालिका प्रशासनाला आढळून आल्या. तसेच, निवृत्त कर्मचार्यांना ओळखपत्र नसल्याने अनेक अडचणीचा सामना करावा लागत होता. त्याकरीता तत्कालिन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी 18 सप्टेंबर 2019ला नियमावली तयार केली.
पूर्वी दिली जाणारी ओळखपत्राची फित ही अधिकारी व कर्मचारी या सर्वासाठी निळ्या रंगाची होती. आता त्यात बदल करण्यात आला आहे. अ, ब, क आणि ड वर्गातील अधिकारी व कर्मचार्यांसाठी ओळखपत्रासाठी वेगवेगळ्या रंगाची फित देण्यात आली आहे. वर्ग 'अ'च्या अधिकार्यांना निळ्या रंगाच्या फिती आहे. वर्ग 'ब' आणि 'क'च्या अधिकारी व कर्मचार्यांना गडद जांभळ्या रंगाची फित आहे.
तर, वर्ग 'ड'च्या कर्मचार्यांसाठी गडद हिरव्या रंगाची फित देण्यात आली आहे. सुमारे 8 हजार अधिकारी व कर्मचार्यांना ओळखपत्रांचे वितरण करण्यात आले आहे. अधिकारी व कर्मचार्यांसाठी वेगवेगळ्या रंगाची फित असल्याबद्दल आश्यर्च व्यक्त केले जात आहे. त्याबाबत महापालिका वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगली आहे.
प्रशासन विभागाने आकार व रंगानुसार मागणी केल्याप्रमाणे मध्यवर्ती भांडार विभागाने ओळखपत्राची खरेदी केली आहे. तर, ओळखपत्राच्या वेगवेगळ्या रंगाच्या फितीबाबत प्रशासन विभागाने कोणताही निर्णय घेतला नाही, असे प्रशासन विभागाने सांगितले.
विभागप्रमुखाकडे अर्ज केल्यानंतर रिसतर नमुन्याचे ओळखपत्र दिले जावे. खराब झालेले ओळखपत्र जमा करून नवीन ओळखपत्र दिले जावे. पालिकेने दिलेले ओळखपत्र अधिकृत समजले जावे. खासगी ठिकाणाहून बनवून घेतलेले ओळखपत्र आढळल्यास संबंधित कर्मचार्यांवर कारवाई केली जाईल. अधिकारी व कर्मचार्यांनी ओळखपत्र त्यांच्या दर्शनी भागात लावणे बंधनकारक आहे. सर्व अधिकारी व कर्मचार्यांना प्रशासन विभागामार्फत ओळखपत्र दिली जातात. ओळखपत्राच्या मागील बाजूस पालिकेचा शिक्का असतो, अशी नियमावली आहे.
हेही वाचा