ड्रग्ज प्रकरणी सिद्धांत कपूरची जामिनावर सुटका | पुढारी

ड्रग्ज प्रकरणी सिद्धांत कपूरची जामिनावर सुटका

बंगळूर : पुढारी वृत्तसेवा : ड्रग्ज प्रकरणी अटक केलेल्या बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत कपूर याची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. वैद्यकीय अहवालात सिद्धांतने ड्रग्ज सेवन केल्याची पुष्टी झाली होती. त्याला सोमवारी अटक करण्यात आली होती. अटकेत असलेल्या इतर चार जणांचीही जामिनावर सुटका करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. जेव्हा चौकशीसाठी बोलावले जाईल तेव्हा सिद्धांत कपूर आणि इतर चार जणांना पोलिसांसमोर हजर व्हावे लागेल, असे बंगळूर पूर्व पोलिसांनी म्हटले आहे.

पंचतारांकीत हॉटेलमध्ये सुरु असलेल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापा टाकून काही तरुणींसह 50 जणांना ताब्यात घेतले आहे. त्यात अभिनेता शक्‍ती कपूर यांचा मुलगा सिद्धांत याचाही समावेश आहे. सिद्धांतसह 10 जणांनी अंमली पदार्थांचे सेवन केल्याचे वैद्यकीय चाचणीत स्पष्ट झाले आहे, असे पोलिसांनी म्हटले आहे.

बंगळूरमधील एमजी रोडवरील एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये रेव्ह पार्टी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सोमवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास बंगळूर पूर्व विभागाचे डीसीपी डॉ. भीमाशंकर गुळेद यांच्या नेतृत्वाखाली 25 जणांच्या पथकाने येथे छापा टाकला. येथे तब्बल 50 जण बेधुंद होऊन नाचत असल्याचे आढळून आले. यामध्ये बॉलीवूडमधील मातब्बर अभिनेत्यांची मुले व मुली, कॉलेज विद्यार्थी व काही राजकीय व्यक्तींची मुलेदेखील होती.

तीन वाहनांतून रुग्णालयात

सर्वांना ताब्यात घेऊन तीन पोलिस वाहनांमध्ये घालून सरकारी रूग्णालयात नेण्यात आले. प्रत्येकाची वैद्यकीय तपासणी केली असता 50 पैकी काही तरुणी तसेच बॉलिवूड अभिनेता सिद्धांत कपूरसह दहाजणांनी अंमली पदार्थाचे सेवन केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

दोन वर्षानंतर रेव्ह पार्टी

गेली दोन वर्षे कोरोनामुळे पार्टीचे आयोजन झालेले नव्हते. परंतु, कोरोनानंतर पहिल्यांदाच बंगळूरमध्ये बॉलिवूड क्षेत्रातील उच्चभू्रूंनी रेव्ह पार्टीचे आयोजन केले होते. या ठिकाणी कर्नाटकाबरोबर महाराष्ट्रसह अन्य राज्यातील अभिनेत्यांची मुलेदेखील सहभागी झाल्याचे सांगण्यात येते. परंतु, काहींनी ड्रग्ज घेतले नसल्याने त्यांची नावे समोर आलेली नाहीत.

माझा मुलगा ड्रग्ज घेत नाही

याबाबत बॉलिवूड अभिनेते शक्ती कपूर यांनी बंगळूर येथे जाऊन मुलाची भेट घेतली. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, माझा मुलगा ड्रग्ज घेत नाही. तो अशा प्रकरणात नसतो, असा दावा केला आहे.

Back to top button