बेळगाव : मतदानासाठी पैसे वाटण्या-या दोघांवर गुन्हा ; ६० हजार जप्त | पुढारी

बेळगाव : मतदानासाठी पैसे वाटण्या-या दोघांवर गुन्हा ; ६० हजार जप्त

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा :  विधान परिषद निवडणुकीत आपल्या उमेदवाराला मत टाकण्यासाठी रक्कम वाटणार्‍या दोघांवर खडेबाजार पोलिसांत गुन्हा दाखल झाला. त्यांच्याकडून 60 हजार रूपयांची रक्कम जप्त केली आहे.

सोमवारी शिक्षक व पदवीधर उमेदवार निवडीसाठी मतदान झाले. खडेबाजार पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणार्‍या बुरूड गल्ली येथील बूथवर दोघेजण मत टाकण्यासाठी मतदारांना पैशाचे अमिष दाखवत असल्याचे आढळून आले. संशयावरून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांच्याकडे 60 हजाराची रोकड सापडली. निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा गुन्हा त्यांच्याविरोधात खडेबाजार पोलिसात दाखल केला आहे.

शरद बचाराम पाटील (53) व गोपाळ रामू मगदूम (वय 57, दोघेही रा. रा. चंदूर, ता. चिकोडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. खडेबाजार पोलिसांत या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून निरीक्षक दिलीप निंबाळकर तपास करत आहेत.

Back to top button