Nashik : मित्रानेच काढला मित्राचा काटा ; वाघेरा डोंगरावरील घटना अपघात नव्हे खून

Nashik : मित्रानेच काढला मित्राचा काटा ; वाघेरा डोंगरावरील घटना अपघात नव्हे खून

नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा
येथे दोन दिवसांपूर्वी प्रेम दौलत गांगुर्डे या मुलाचा डोंगरावरून पडून मृत्यू झाल्या प्रकरणी वणी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. मात्र, त्याबाबत सखोल तपासात पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्याचा शोध लावत मित्रानेच मित्राचा काटा काढल्याचे उघडकीस आणले आहे. यात संशयित श्रावण (शेर्‍या) रमेश सकट (18) याला ताब्यात घेण्यात आले आहे.

या प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या संशयितास मृत प्रेम हा नेहमीच शिवीगाळ करून दादागिरी करीत असे. त्याचा राग धरून काटा काढण्याच्या उद्देशाने श्रावण हा प्रेमला घेऊन औताळे शिवारातील वाघेरा डोंगरावर गेला होता. तिथे दोघांनी नशा केली. त्यानंतर संशयित श्रावणने प्रेमच्या डोक्यात दगड मारला. त्याचा प्रतिकार केला असता, गंभीर मार लागल्याने प्रेम जमिनीवर कोसळला. श्रावणने पुन्हा डोक्यात दगड टाकून वाघेरा डोंगरावरून फेकून दिले. त्यानंतर घरी येताच कपडे लपवून घोटीला रवाना झाला. मात्र, त्याने पोलिस तपासात आधी प्रेम सेल्फी घेताना पाय घसरून पडल्याचा बनाव केला होता. परतू खरी हकीगत मयत प्रेम संशयित आरोपीला त्रास देत असल्याचे चौकशीत समोर आले आहे.

यापूर्वीही प्रेमचा काटा काढण्याच्या उद्देशाने श्रावणने दोनदा प्रयत्न केला होता. मात्र, दोन्ही वेळेस त्याचा प्रयत्न फसल्याने तिसर्‍यांदा त्याने सूड उगवला. वणी पोलिसांनी श्रावणला ताब्यात घेत त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्या सूचनांनुसार, वणी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक स्वप्नील राजपूत यांनी त्यांच्या पोलिस कर्मचार्‍यांसोबत घटनास्थळी जाऊन शहानिशा करीत आवश्यक सर्व पुरावे संकलित केले आहेत. या तपास कामी पोलिस उपनिरीक्षक रतन पगार, प्रवीण उदे, पोलिस कर्मचारी साहेबराव वडजे, किरण धुळे, किरण गांगुर्डे, दिलीप राऊत, विजय खांडवी, प्रदीप शिंदे, कमलेश देशमुख यांनी काम पाहिले.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news