साडेतीन हजार जणांची झाडाझडती; पुणे पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन

साडेतीन हजार जणांची झाडाझडती; पुणे पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन

पुणे, पुढारी वृत्तसेवा: शहरात कोम्बिंग ऑपरेशन राबवीत पुणे पोलिसांनी साडेतीन हजार गुन्हेगारांची झाडाझडती घेतली. या कारवाईत
685 गुन्हेगार सापडले असून दोन पिस्तुले, काडतुसे आणि शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. चंदननगरमधील हुक्का पार्लरवरही कारवाई करण्यात आली. शहरातील वाढती गुन्हेगारी तसेच गुन्हेगारांना जरब बसविण्यासाठी पोलिसांकडून अचानक विशेष मोहीम (ऑल आऊट आणि कोम्बिंग ऑपरेशन) राबविण्यात येते.

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त संदीप कर्णिक, अतिरिक्त आयुक्त नामदेव चव्हाण, राजेंद्र डहाळे, उपायुक्त भाग्यश्री नवटके, प्रियंका नारनवरे, सागर पाटील, पौर्णिमा गायकवाड, रोहिदास पवार, वाहतूक शाखेचे उपायुक्त राहुल श्रीरामे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा तसेच स्थानिक पोलिस ठाण्याची पथके या मोहिमेत सहभागी झाली होती.

बेकायदा पिस्तूल बाळगल्याप्रकरणी गुन्हे शाखेने तीन ठिकाणी कारवाई केली. या कारवाईत तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून दोन पिस्तुलांसह चार काडतुसे, 79 खराब काडतुसे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. बेकायदा तलवार, कोयते बाळगल्याप्रकरणी 29 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दोन तलवारी, 21 कोयते जप्त करण्यात आले.

यांनाही ठोकल्या बेड्या

भारती विद्यापीठ परिसरातील फरार गुन्हेगार प्रथमेश चंद्रकांत कांबळे (वय 18, रा. कात्रज) याला पकडण्यात आले तसेच जय विटकर, अनिल विटकर (रा. लाल चाळ, गोखलेनगर) यांना मारहाण प्रकरणातील गुन्ह्यात अटक करण्यात आली. वडकी गावातील शेखर अनिल मोडक (वय 27), पंकज अभिमन्यू रणवरे (वय 35, रा. रामकृष्ण अपार्टमेंट, बाणेर रस्ता) यांना अटक करण्यात आली. दोघांकडून दोन पिस्तुले, चार काडतुसे जप्त करण्यात आली.

चंदननगर येथील हुक्का पार्लरवर कारवाई

अमली पदार्थविरोधी पथकाने चंदननगर भागातील बेकायदा हुक्का पार्लरवर कारवाई केली. या कारवाईत हुक्कापात्र, तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आले. याप्रकरणी हुक्का पार्लरचा मालक सिद्धार्थ राजेश अष्टेकर (वय 25, रा. चंदननगर) याला अटक करण्यात आली.

वाहनचालकांवर कारवाई

वाहतूक विभागाने 492 संशयित वाहनचालकांची तपासणी करून 276 दुचाकींवर, 19 तीनचाकी व 197 चारचाकींवर कारवाई केली. गुन्हे शाखा व स्थानिक पोलिसांनी 14 तडीपार गुन्हेगारांवर कारवाई केली आहे. शहरातील 391 हॉटेल, ढाबे, लॉज तसेच एसटी स्टँड, रेल्वेस्थानक, निर्जन ठिकाणांची तपासणी करण्यात आली. सीआरपीसी कायद्याप्रमाणे 80 आरोपींविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news