रसिकांना आली पुलंच्या द्रष्टेपणाची प्रचिती | पुढारी

रसिकांना आली पुलंच्या द्रष्टेपणाची प्रचिती

पुणे, पुढारी वृत्तसेवा: पुलंमधला संगीतकार, साहित्यिक, त्यांच्यातील तत्त्ववेत्ता असे एकेक पैलू उलगड जात होते. श्रोत्यांमधून टाळ्यांचा कडकडाट होत होता आणि पुलंच्या द्रष्टेपणाची प्रचिती येत प्रेक्षकांमधून वाहवा उमटत होती. आशय फिल्म व सांस्कृतिक क्लबतर्फे आयोजित दोनदिवसीय ‘कोहिनूर पु. ल. स्मृती महोत्सवा’त ‘द्रष्टे पु. ल.’ या विषयावर रविवारी (दि. 12) परिसंवाद रंगला. या परिसंवादात डॉ. मंदार परांजपे, प्रकाश मगदूम, प्रवीण तरडे, डॉ. आशुतोष जावडेकर आणि डॉ. रामचंद्र देखणे सहभागी झाले होते.

महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी या परिसंवादाचे सूत्रसंचालन केले. या वेळी डॉ. जावडेकर म्हणाले, ‘हार्मोनियमऐवजी माझ्या हातात सतार आली असती, तर खूप चांगले झाले असते, असे ते म्हणायचे. यातून त्यांच्यातील संगीतकाराचा पैलू व्यक्त होतो. संगीत ही त्यांची पहिली ओळख झाली नाही, तर शब्दकार म्हणून झाली.’ तरडे म्हणाले, ‘अलीकडे जात, पंथ, धर्म, विचारधारा बघून पुस्तके विकत घेण्याकडे कल दिसून येतो. परंतु, केवळ पुलंचे साहित्य समाजातील सर्व स्तरातील घटकांपर्यंत संवाद साधते.

पुलंचे आयुष्य एखाद्या स्क्रीनप्लेसारखे होते. त्यांच्या साहित्यातून ज्या व्यक्तिरेखा पेरल्या, त्या वाचताना आपण केवळ पुस्तकाची पाने उलटवली नाही, तर त्या व्यक्तिरेखा उलगडायचो.’ डॉ. देखणे म्हणाले, ‘पुलंमधल्या विनोदात मला एक तत्त्ववेत्ता दिसतो. व्यंगाला अव्यंगाकडे नेले की तत्त्वज्ञानाकडे प्रवास सुरू होतो. पुलंच्या साहित्यातून व्यक्त होणारे अनुबंध त्यांच्यातील तत्त्ववेत्याला जोडले गेलेले होते.’ प्रकाश मगदूम, डॉ. मंदार परांजपे यांनीही मनोगत व्यक्त केले. महोत्सवाचे संयोजक वीरेंद्र चित्राव, सतीश जकातदार, नयनीश देशपांडे यांनी स्वागत केले.

हेही वाचा

नगर : नान्नजमध्ये एकावर तलवारीने हल्ला

नाशिक : जिल्ह्यात कोणत्या धरणात किती पाणीसाठा?

पेट्रोल, सीएनजी पंपाला ग्रीन बेल्टमध्ये परवानगी नाही

Back to top button