छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी रायगड सांभाळणाऱ्या पोतनीसांना किती पगार होता? बलकवडे यांचे संशोधन

छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी रायगड सांभाळणाऱ्या पोतनीसांना किती पगार होता? बलकवडे यांचे संशोधन
Published on
Updated on

पुणे, पुढारी वृत्तसेवा: किल्ले रायगड हिंदवी स्वराज्यात आणण्यात मोलाची कामगिरी सरदार यशवंतराव पोतनीस यांनी बजावली. पण आजपर्यंत पोतनीस घराण्याचा इतिहास सांगणारी कोणतीही कागदपत्रे उपलब्ध नव्हती. अखेर हा इतिहास सांगणारी कागदपत्रे ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांना सापडली आहेत.

बलकवडे यांना भारत इतिहास संशोधक मंडळाच्या दफ्तरखान्यात रायगडाशी संबंधित दोन रुमाल, म्हणजेच अंदाजे 2000 मोडी कागदपत्रे सापडली आहेत. त्यात 44 वर्षांनंतर 6 जून 1733 रोजी रायगड मुक्त करणारे छत्रपती शाहू महाराज यांचे खासगी आणि खजिन्याचे कारभारी यशवंतराव पोतनीस यांच्याबद्दलचा संग्रह सापडला आहे.

त्यात 1766 साली रायगडाच्या रक्षणासाठी छत्रपती शाहू यांनी नेमलेल्या 529 लोकांची नावे, त्यांचे वय, ते चालवत असलेली शस्त्रे आणि त्यांचा पगार याविषयीची माहिती उपलब्ध आहे. शिवाय रायगडचा किल्लेदार, सरनोबत, तटसरनोबत, सरनाईक, तटसरनाईक,
कारखानीस, सबनीस, मुजुमदार, फडणीस, दफ्तरदार, कोठावळा, गोलंदाज, जंजालदार इत्यादींची नावे समजतात.

रायगडावर महाडिक, मालुसरे, पलांडे, मामुनकर, शेळके, पोतनीस इत्यादी आडनावांचे जवळपास 37 सरदार आपल्या पथकासह रायगडाच्या रक्षणाची जबाबदारी पार पाडत होते, असेही यातून समोर आले आहे. रायगडाच्या इतिहासाविषयी बलकवडे म्हणाले, 20 फेब्रुवारी 1707 ला औरंगजेबाच्या निधनानंतर युवराज शाहूंची सुटका झाली.

स्वराज्यात आल्यानंतर त्यांनी काही काळ संघर्ष करून आपला अधिकार प्राप्त केला. शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली 18 व्या शतकात मराठा साम्राज्याचा पाया घातला गेला. परंतु, 1733 सालापर्यंत रायगड किल्ला शत्रूच्या ताब्यातच होता. 44 वर्षांच्या पारतंत्र्यानंतर 6 जून 1733 रोजी शिवतीर्थ रायगड किल्ला पुन्हा स्वराज्यात आला.

त्यामध्ये सरदार यशवंतराव पोतनीस यांनी मोलाची कामगिरी केली होती. म्हणूनच शाहू महाराजांनी रायगडाच्या रक्षणाची व कारभाराची जबाबदारी पोतनीसांवर सोपविली होती. 1733 पासून 1772 पर्यंत 41 वर्षे पोतनीस घराण्याने रायगडाचे रक्षण केले. 1772 मध्ये छत्रपती रामराजे यांच्या आज्ञेने रायगड किल्ला पेशव्यांच्या ताब्यात आला.

तो 1818 पर्यंत म्हणजेच इंग्रज सेनापती प्रॉथर याने जिंकेपर्यंत पेशव्यांच्या ताब्यात होता. नव्याने उपलब्ध झालेली रायगड किल्ल्याशी संबंधित ही कागदपत्रे अत्यंत महत्त्वाची आणि दुर्मीळ आहेत. त्यांच्या अभ्यासातून रायगडाच्या इतिहासावर नव्याने प्रकाश पडणार आहे.

रायगडावरील लोकांचे पगारपत्रकही उपलब्ध

यशवंत महादेव पोतनीस आणि त्यांच्या पश्चात त्यांचे पुत्र विठ्ठल यशवंत पोतनीस जवळपास 41 वर्षे म्हणजेच इ. स. 1733 पासून 1772 पर्यंत रायगडाचे रक्षण आणि कारभार पाहात होते. त्यांना 1 लाख 75 हजार 306 रुपयांचा सरंजाम छत्रपती शाहू महाराज यांनी लावून दिला होता. पोतनीस यांचा शिक्कादेखील या कागदपत्रात आपल्याला पाहायला मिळेल. बलकवडे यांच्या नव्या संशोधनामुळे रायगडावरच्या सर्व 529 लोकांची नावे व त्यांचे पगारपत्रक पहिल्यांदाच उपलब्ध होत आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news