राज्यात तीन ते चार दिवस वादळी वार्‍यासह मुसळधार; पुण्याला यलो अलर्ट | पुढारी

राज्यात तीन ते चार दिवस वादळी वार्‍यासह मुसळधार; पुण्याला यलो अलर्ट

पुणे, पुढारी वृत्तसेवा: पुढील तीन ते चार दिवस राज्याच्या बहुतांश भागात वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह मुसळधार, तसेच अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने शनिवारी वर्तवली आहे.

दरम्यान, अनुकूल स्थितीमुळे मान्सूनने जोरदार मुसंडी मारली आहे. शनिवारी पुणे, मुंबईसह मध्य महाराष्ट्राचा काही भाग त्याने व्यापला. पुढील दोन ते तीन दिवसांत तो मराठवाडा, कोकणचा काही भाग, मध्य महाराष्ट्राचा उर्वरित भाग, तसेच विदर्भापर्यंत मजल मारण्याची शक्यता आहे.

कमी दाबाचा पट्टा सक्रिय, मान्सूनला पोषक

मान्सूनच्या प्रगतीसाठी महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून ते दक्षिण कर्नाटकाच्या किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. या पट्ट्याबरोबरच दक्षिण गुजरातपासून ते मध्य अरबी समुद्रापर्यंत द्रोणीय स्थिती तयार झाली आहे. या दोन्ही स्थितीच्या परिणामामुळे मान्सूनला आगेकूच करण्यास अत्यंत पोषक असे वातावरण आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत मान्सून उत्तर भारताकडे सरकण्याची शक्यता आहे.

राज्यात पुढील तीन ते चार दिवस ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहे. त्यातच मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटामुळे राज्यातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आणि विदर्भाच्या बहुतांश भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राबरोबरच कर्नाटकची किनारपट्टी, केरळ, राजस्थान, चंढीगड, गोवा, दक्षिण गुजरातची किनारपट्टी, दक्षिण ओडिशा, आंध्र प्रदेश, बंगालच्या उपसागरातील काही भाग, अरबी समुद्राच्या बहुतांश भागात वादळी वार्‍यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हेही वाचा 

टेनिसमध्ये सुवर्णाची ‘आकांक्षा’पूर्ती

पुणे : मासेमारी करताना बोट उलटून एक जण बुडाला; पिंपळगाव जोगा धरणातील घटना

सातारा : लिंब जिल्हा परिषदेत गावे झाली कमी, पण दबदबा कायम

Back to top button