सातारा : लिंब जिल्हा परिषदेत गावे झाली कमी, पण दबदबा कायम | पुढारी

सातारा : लिंब जिल्हा परिषदेत गावे झाली कमी, पण दबदबा कायम

लिंब ; प्रवीण राऊत : लिंब जिल्हा परिषद गटातील पुनर्रचनेमुळे गटातील गावांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे या गटावर लिंब गावाचाच दबदबा राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. लिंब गटातील किडगाव गणातील तब्बल 15 गावे कमी झाली आहेत. लिंब गटात नव्याने फक्त तीन गावांचा समावेश झाला आहे. किडगाव गणातील गावे कमी झाल्याने लिंब गटात नव्याने पानमळेवाडी गण तयार झाला असून लिंब गण आहे तसाच राहिला आहे.

सातारा तालुक्यात गट व गणांची संख्या कायम राहिली असली तरी बहुतांश गट व गणांच्या रचनेत मोठी अदलाबदल झाली आहे. लिंब गटातील तब्बल 15 गावे नव्याने निर्माण झालेल्या कोंडवे गटात गेली आहेत. लिंब गटात पाटखळ गटातील गोवे, मर्ढे आणि म्हसवे या तीनच गावांचा नव्याने समावेश झाला आहे. राजकीयदृष्टया संवेदनशील समजल्या जाणार्‍या लिंब गावाने नेहमीच सातारा तालुक्यातील राजकारणात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. त्यामुळे तालुक्याच्या राजकारणात लिंब गावास अनन्य साधारण महत्व आहे. लिंब गटात आजअखेर लिंब गावाचाच दबदबा राहिला असून पुनर्रचनेने तो आणखी वाढला आहे.

लिंब जिल्हा परिषद गटातील पुनर्रचनेत लिंब गणातील पूर्वीची वर्ये, रामनगर, पानमळेवाडी, नेले आणि पिंपळवाडी ही गावे कमी झाली आहेत तर गोवे आणि मर्ढे ही पाटखळ गटातील गावे लिंब गटात समाविष्ट झाली आहेत. लिंब गणात लिंब, कोंढवली, नागेवाडी, कुशी, गोवे आणि मर्ढे अशी गावे आहेत. तर किडगाव गण कमी होऊन त्या ठिकाणी पानमळेवाडी हा नवीन गण तयार झाला आहे. या गणात पानमळेवाडी, पिंपळवाडी, रामनगर, वर्ये, नेले, किडगाव, कळंबे, आकले, माळ्याचीवाडी, धावडशी आणि म्हसवे ही गावे समाविष्ट झाली आहेत. लिंब गटातील गावे कमी झाली असली तरीही लोकसंख्येच्या दृष्टीने मतदार संघ तेवढाच राहिला आहे. या गटात लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे गाव लिंब असून मतदान आणि राजकीय दृष्ट्याही या गटावर लिंब गावाचाच दबदबा राहणार आहे.

उमेदवार निवडीवेळी लोकप्रतिनिधींचा लागणार कस

लिंब गटावर आ. शिवेंद्रराजे भोसले यांचेच वर्चस्व राहिले आहे. या गटात आता नव्याने कोरेगाव विधानसभा मतदार संघातील आणि पाटखळ गटातील तीन गावे समाविष्ट झाली आहेत. लिंब गटातील प्रामुख्याने लिंब, गोवे, मर्ढे, नागेवाडी, कुशी, पानमळेवाडी, वर्ये, नेले-किडगाव, कळंबे, धावडशी आणि माळ्याचीवाडी ही गावे राजकीयदृष्टया जागृत आहेत. त्यामुळे लिंब गटात इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी असून उमेदवारांची निवड करताना लोकप्रतिनिधींचा कस लागणार आहे.

Back to top button