धोक्याची घंटा : अंटार्क्टिकमधील बर्फातही सापडले सूक्ष्म प्लास्टिकचे कण!

धोक्याची घंटा : अंटार्क्टिकमधील बर्फातही सापडले सूक्ष्म प्लास्टिकचे कण!

मेलबर्न : वृत्तसंस्था / पुढारी ऑनलाईन : न्यूझीलंडमधील शास्त्रज्ञांना अंटार्क्टिकामध्ये नव्याने पडलेल्या बर्फात पहिल्यांदाच सूक्ष्म प्लास्टिकचे कण सापडले आहेत. हे प्लास्टिकचे सूक्ष्म कण तांदळाच्या दाण्यापेक्षाही खुप लहान आहेत. हे सूक्ष्म प्लास्टिक कण अंटार्क्टिकावरील बर्फ वेगाने वितळण्यास कारणीभुत ठरण्याची शक्यत असून, त्याचा जागतिक वातावणावर गंभीर परिणाम होण्याची शक्यताही या शास्त्रज्ञांनी वर्तविली आहे.

क्रायोस्फियर जर्नलमध्ये हे संशोधन प्राकाशित करण्यात आले असून, या सूक्ष्म प्लास्टिक कणांमुळे अंटार्क्टिकावरील वातावरणाला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो असा इशाराही या शास्त्रज्ञांनी दिला आहे. अशा सूक्ष्म प्लास्टिक कणांचा हवामानावर, प्रजननावर, जीवांच्या नियमित जैवशास्त्रीय क्रियांवर आणि मानवावरही नकारात्मक परिणाम होत असल्याचे या पूर्वी झालेल्या संशोधनांमध्ये अधोरेखीत करण्यात आलेले आहे.

पीएचडी करणाऱ्या विद्यर्थिनीने केले संशोधन

न्यूझीलंडमधील कॅन्टरबरी विद्यापीठात पीएचडीचा अभ्यास करणारी अ‍ॅलेक्स अ‍ॅव्हेस हिने 2019 च्या शेवटी अंटार्क्टिकातील रॉस आईस शेल्प येथून बर्फाचे काही नमुने गोळा केले होते. त्यावेळी सूक्ष्म प्लास्टिक कणांच्या हवेमधील अस्तित्वासंदर्भात खूप कमी संशोधन झाले होते. आणि हा गंभीर विषय किती खोलवर पसरला आहे याची कल्पना कोणालाही नव्हती, असेही या शास्त्रज्ञांनी या जर्नलमध्ये मांडलेल्या निरीक्षणात म्हटले आहे.

'जेंव्हा अ‍ॅलेक्स 2019 साली अंटार्क्टिकावर गेली होती, त्यावेळी तिला या दुर्गम आणि मानवरहित भागात सूक्ष्म प्लास्टिक कण सापडणार नाहीत अशी आम्हाला आशा होती', असे कॅन्टरबरी विद्यापीठातील असोसिएट प्राध्यापक लॉरा रीव्हेल यांनी सांगितले. मात्र जेंव्हा अ‍ॅलेक्स विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत परतली, तेंव्हा तिने रॉस आईस शेल्फ सारख्या दुर्गम भागातून आणलेल्या प्रत्येक नमुन्यात (सँपल) सूक्ष्म प्लास्टिक कण अढळल्याचे सांगत, हा विषय सगळ्या जगाच्या दृष्टीने गंभीर असल्याचे त्या म्हणाल्या.

'अंटार्क्टिकासारख्या दुर्गम भागातही सूक्ष्म प्लास्टिक कण सापडणे ही अत्यंत दुर्दैवी आणि दुःखद बाब असून, प्रदुषण किती खोलवर घात करत आहे हे अधोरेखीत करते', असे रीव्हेल म्हणाल्या. रॉस आयलंडमधील 19 ठिकाणांहून आम्ही हे नमुने (सँपल) गोळा केले आणि आम्हाला या प्रत्येक नमुन्यात (सँपल) सूक्ष्म प्लास्टिक कण अढळल्याचेही त्या म्हणाल्या.

ऑव्हेसने बर्फाच्या या नमुन्यांचे (सँपल) रासायनिक प्रक्रियेद्वारे विश्लेषण केले आणि या कणांचा रंग, आकार आणि आकारमान जाणून घेण्यासाठी सूक्ष्मदर्शक यंत्राखालीही त्याची चाचणी केली. यात एका लिटरमध्ये जवळपास 29 सूक्ष्म प्लास्टिक कण सापडल्याचे संशोधकांनी सांगितले. हे प्रमाण पूर्वी केलेल्या अभ्यासाच्या तुलनेत प्रचंड वाढलेले असल्याचे निदर्शनास येत असल्याचेही या शास्त्रज्ञांनी नमूद केले आहे. अंटार्क्टिकातील बर्फामध्ये सापडलेल्या या सूक्ष्म प्लास्टिक कणांमुळे प्रदुषणाचा राक्षास किती पाय पसरत आहे हेच यावरून लक्षात येते!

logo
Pudhari News
pudhari.news