देशातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ सुरुच, २४ तासांत ७,५८४ नवे रुग्ण, २४ मृत्यू | पुढारी

देशातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ सुरुच, २४ तासांत ७,५८४ नवे रुग्ण, २४ मृत्यू

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन

देशातील कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सलग दुसऱ्या रुग्णसंख्येने ७ हजारांचा आकडा पार केला आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे ७,५८४ नवे रुग्ण आढळून आले. तर २४ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे देशातील सक्रिय रुग्णसंख्या ३६,२६७ वर पोहोचली आहे. सक्रिय रुग्णसंख्येत ३,७६९ ने वाढ झाली आहे. दिवसभरात ३,७९१ रुग्णांनी कोरोनावर मात केली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

याधीच्या दिवशी देशात तब्बल तीन महिन्यांनी दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत ४० टक्के वाढ नोंदवण्यात आली होती. बुधवारी दिवसभरात ७ हजार २४० कोरोनाबाधितांची भर पडली होती. तर, ८ रुग्णांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, ३ हजार ५९१ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली होती. यापूर्वी दोन मार्चला सर्वाधिक ७ हजार ५५४ कोरोनाबाधितांची नोंद घेण्यात आली होती. गुरूवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९८.७१ टक्क्यांवर घसरला. तर, दैनंदिन कोरोनासंसर्गदर २.१३ टक्के आणि आठवड्याचा कोरोनासंसर्गदर १.३१ टक्के नोंदवण्यात आला होता.

देशात कोरोनाविरोधात सुरू करण्यात आलेल्या लसीकरण अभियानातून आतापर्यंत १९४ कोटी ७६ लाख ४२ हजार ९९२ डोस देण्यात आले आहेत. यातील ३.४७ कोटी डोस १२ ते १४ वयोगटातील बालकांना देण्यात आले आहेत. तर, खबरदारी म्हणून आतापर्यंत ३ कोटी ७७ लाख बूस्टर डोस देण्यात आले आहेत.

केंद्र सरकारकडून पुरवण्यात आलेल्या १९३ कोटी ५३ लाख ५८ हजार ८६५ डोस पैकी १४ कोटी १ लाख ६८ हजार ४१५ डोस अद्यापही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे शिल्लक असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. देशात आतापर्यंत ८५ कोटी ३८ लाख ६३ हजार २३८ कोरोना तपासण्या करण्यात आल्या आहेत. यातील ३ लाख ४० हजार ६१५ तपासण्या बुधवारी दिवसभरात करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली आहे.

Back to top button