मुंबई; पुढारी ऑनलाईन
राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांना मतदानासाठी तूर्त परवानगी मिळालेली नाही. मतदानासाठी जामीन देण्याची मागणी करणारी त्यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आली आहे. याचिकेत सुधारणा करुन नव्याने याचिका दाखल करण्याची परवानगी त्यांना देण्यात आली आहे. जामीन मिळत नसेल तर मतदानाची परवानगी द्या, असा युक्तिवाद त्यांच्या वकिलांनी केला होता.
राज्यसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी तुरुंगातून तात्पुरती सुटका करण्याची मागणी त्यांनी केली होती. त्यांची ही मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी परवानगी देण्यास राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांना सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायालयाने गुरुवारी परवानगी नाकारली होती. त्या विरोधात दोघांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. नवाब मलिक यांच्या याचिकेवर न्यायालयाने आपला निकाल दिला आहे.
राज्यसभेच्या ६ जागांसाठी आज शुक्रवारी (दि.१०) मतदान होत आहे. दरम्यान, मनी लॉंड्रिंग प्रकरणी अटकेत असणारे नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना मतदान करण्यास परवानगी नाकारण्यात आली होती. याबाबतचा निर्णय मुंबईच्या विशेष पीएमएलए न्यायालयाने काल गुरुवारी दिला होता. त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला.
पीएमएलए न्यायालयाचे विशेष न्यायाधिश राहुल रोकडे यांनी नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांचे राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान करण्याची परवानगी मागणारे अर्ज फेटाळून लावले होते. यामुळे दोघांनाही परवानगी नाकारली गेल्याने महाविकास आघाडीची दोन मते कमी पडणार आहेत.