फ्रान्समध्ये सूर्य निर्मितीचा प्रयत्न | पुढारी

फ्रान्समध्ये सूर्य निर्मितीचा प्रयत्न

पॅरिस ; वृत्तसंस्था : फ्रान्समध्ये स्वच्छ ऊर्जेचा स्रोत मिळविण्यासाठी सूर्य निर्मितीची तयारी केली जात आहे. या प्रकल्पात भारतासह 35 देशांचे शास्त्रज्ञ मेहनत घेत आहेत. मानवाच्या ऊर्जेच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी हा प्रकल्प असून यातून एक ग्रॅम अणुपासून 8 टन खनिज तेलाच्या बरोबरीची ऊर्जा निर्मिती केली जाणार असल्याचे कळते.

फ्रान्सच्या दक्षिणेकडील डोंगराळ भागात हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. जेव्हा हा प्रकल्प पूर्णत्वास येईल तेव्हा ऊर्जा संकट टळेल, असे बोलले जात आहे. ही मानवी इतिहासातील एक मोठी उपलब्धी असणार असल्याचीही चर्चा आहे. न्यूक्लियर फ्यूजनद्वारे ही ऊर्जा निर्मिती साधली जाणार आहे.

आपल्या सूर्यमालेतील सूर्यासह इतर तार्‍यांमध्ये घडणारी ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. तथापि, ही प्रक्रिया पृथ्वीर घडवून आणणे सोपे नाही. न्यूक्लियर फ्यूजनद्वारे अमर्याद स्वच्छ ऊर्जा मिळते. या ऊर्जेतून कुठल्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही. किरणोत्सारी कचराही निर्माण होत नाही.

फ्यूजन रिअ‍ॅक्शन दीर्घकाळ चालू ठेऊ शकणारा रिअ‍ॅक्टर

फ्रान्सच्या आंतरराष्ट्रीय थर्मोन्यूक्लियर प्रायोगिक रिअ‍ॅक्टर हे पहिले असे उपकरण आहे, जे फ्यूजन रिअ‍ॅक्शन दीर्घकाळ सुरू ठेऊ शकेल. यातील तंत्रज्ञान आणि मटेरियलची चाचणी होणार आहे. त्याचा वापर व्यावसायिक वीज निर्मितीसाठी केला जाणार आहे.

1985 मध्ये पहिल्यांदा ही कल्पना समोर आली होती. याचे डिझाईन बनविण्यात भारत, जपान, कोरिया, युरोपीय संघ आणि अमेरिकेच्या शास्त्रज्ञांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे.

Back to top button