केशर आंबा प्रथमच समुद्रमार्गे अमेरिकेला; 16 हजार 560 किलो आंब्यांची निर्यात | पुढारी

केशर आंबा प्रथमच समुद्रमार्गे अमेरिकेला; 16 हजार 560 किलो आंब्यांची निर्यात

पुणे : पुढारी वृत्तसेवा

देशातून अमेरिकेला होणारी आंबा निर्यात ही सध्या शंभर टक्के हवाईमार्गे होत असली तरी, विमान भाडे अधिक आहे. मात्र यंदा केशर आंबा प्रथमच समुद्रमार्गे अमेरिकेला निर्यात करण्यात आला. त्यामुळे आंब्यांचा वाहतूक खर्च कमी होणार आहे. भारतीय आंब्याच्या निर्यातीमधील हा ऐतिहासिक क्षण असल्याची माहिती राज्याचे पणन संचालक आणि महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, भाभा अ‍ॅटोमिक रिसर्च सेंटर, अपेडा आणि सानप ग्रोनिमल्स प्रा.लि. यांच्या संयुक्त प्रयत्नांनी आंबा निर्यात झाली आहे. पणन मंडळाच्या वाशी येथील विकीरण सुविधा केंद्रातून शुक्रवारी (दि.3) पवार यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून आंबा निर्यातीसाठी तो बंदराकडे रवाना करण्यात आला.

एकूण 5 हजार 520 बॉक्समधून 16 हजार 560 किलो आंबा समुद्रमार्गे निर्यात करण्यात आला. त्यावेळी कार्यक्रमास भाभा अ‍ॅटोमिक रिसर्च सेंटरच्या बायोसायन्स विभागाचे संचालक डॉ. टी. के. घंटी, पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉ.भास्कर पाटील उपस्थित होते.

ऊस नोंदीचे राजकारण संपणार; मोबाईल अ‍ॅपमधून घरबसल्या करता येणार कारखान्यांकडे नोंद

निर्यातीमध्ये क्रांती होणारा बदल

निर्यातदारांना प्रति किलो सुमारे 550 रुपयांइतके विमानभाडे दयावे लागते. यामुळे अमेरिकेच्या बाजारपेठेत भारतीय आंबा किंमतीच्यादृष्टीने महाग पडून निर्यातीवर मर्यादा येत असत. समुद्रमार्गे आंबा निर्यातीमुळे अमेरिकेतील बाजारपेठेत भारतीय आंबा स्पर्धात्मकरीत्या उतरून इतर देशांतील आंब्याशी स्पर्धा करु शकेल. तसेच समुद्रमार्गे निर्यातीमुळे आंबा सुमारे दीड महिन्याच्या जादा कालावधीसाठी तेथील बाजारपेठेत राहील.

भारतीय आंब्याच्या इतिहासातील ही अत्यंत महत्त्वाची घटना असुन निर्यातीमध्ये क्रांती होणारा हा बदल असल्याचेही त्यांनी सांगितले. डॉ. टी. के. घंटी यांनी कृषिमालाची निर्यात आणि कृषिमालाची साठवणूक क्षमता वाढविण्यासाठी भाभा अ‍ॅटोमिक रिसर्च सेंटर कृषी पणन मंडळास सर्वतोपरी मदत करेल. संशोधनात आम्ही मोठे काम करीत आहोत. तथापी आमचे संशोेधन शेतकर्‍यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषि पणन मंडळाने काम करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

हेही वाचा 

स्वाभिमान : पल्लवी आणि शांतनू अडकले विवाहबंधनात

28 हजार 355 कोटींचा नाबार्डकडून पतपुरवठा; राज्यात उद्दिष्टाहून अधिक अर्थसहाय्य

पुणतांबा शेतकरी आंदोलनावर मुंबईत तोडगा निघेल का?

Back to top button