

पुणे : पुढारीे वृत्तसेवा
राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेने (नाबार्ड) 2021-22 या आर्थिक वर्षात राज्यातील कृषी आणि ग्रामीण विकासासाठी ठेवलेले 27 हजार 710 कोटींचे पतपुरवठ्याचे उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण केले आहे. सुमारे 28 हजार 355 कोटींचे अर्थसहाय्य केल्याची माहिती नाबार्डकडून कळविण्यात आली आहे.
बँकांना केलेला 598 कोटींचा दीर्घकालीन पतपुरवठा आणि 5 हजार 598 कोटींचा अल्पकालीन पतपुरवठ्याचा यात समावेश आहे. ग्रामीण पायाभूत सुविधा विकास निधी, दीर्घकालीन सिंचन निधी आणि नाबार्ड पायाभूत सुविधा विकास सहाय्यअंतर्गत राज्यातील पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी 3 हजार 118 कोटींचे आर्थिक सहाय्य वितरित करण्यात आले आहे.
नाबार्डच्या राज्यातील विकास योजनांमध्ये एकत्रिपणे 4.52 लाख हेक्टर क्षेत्रावर 361 पाणलोट प्रकल्प, 47 हजार 800 कुटुंबे समाविष्ट असणारे 55 आदिवासी विकास प्रकल्प, पशुसंवर्धन आणि मत्स्यव्यवसाय अंतर्गत 14 एफपीओसह 187 एफपीओंना मदत, 115 एफपीओला प्रोत्साहन देण्याचा समावेश आहे. विविध कौशल्य विकास आणि उद्योजकता विकास कार्यक्रमांतर्गत स्वयंसहायता समूहांच्या 570 महिला आणि तरुणांना उपजीविका आणि कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात आले आहे.
कृषी उत्पादनांच्या जैवविविधतेच्या संरक्षणास प्रोत्साहन देण्यासाठी नाबार्डकडून नंदुरबार आमचूर, नंदुरबार लाल मिरची, बसमत-हिंगोलीची हळद, सावंतवाडी-सिंधुदुर्गची लाकडी खेळणी, मिरज-सांगलीचे सतार वाद्य, तानपुरा वाद्य आणि हुपरीचे (कोल्हापूर) सिल्व्हर क्राफ्ट यांच्या भौगोलिक मानांकन नोंदणीला मदत करण्यात येत आहे.
हेही वाचा