ऊस नोंदीचे राजकारण संपणार; मोबाईल अ‍ॅपमधून घरबसल्या करता येणार कारखान्यांकडे नोंद | पुढारी

ऊस नोंदीचे राजकारण संपणार; मोबाईल अ‍ॅपमधून घरबसल्या करता येणार कारखान्यांकडे नोंद

पुणे : पुढारी वृत्तसेवा

राज्यातील उसाच्या नोंदीचे राजकारण आता संपुष्टात येणार असून शेतकर्‍यांना आपल्या उसाची नोंद घरबसल्या संबंधित साखर कारखान्याकडे मोबाईल अ‍ॅपद्वारे करता येणार आहे. साखर आयुक्तालयाकडून येणारा गाळप हंगाम 2022-23 साठीच्या ऊस नोंदीसाठी लवकरच असे अ‍ॅप आणण्याची तयारी पूर्ण झाल्याची माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली.

राज्यातील 200 साखर कारखान्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील उसाची नोंद मोबाईल अ‍ॅपवर नोंदविण्यासाठी साखर आयुक्तालय प्रयत्नशिल आहे. अ‍ॅप तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून शेतकर्‍यांना आपल्या कारखान्यांच्या नावासमोर ऑनलाईनद्वारे ऊस नोंद करता येईल. तसेच गाळपासाठी जवळच्या तीन साखर कारखान्यांच्या नावांचाही पर्याय देण्यात आला आहे.

स्वाभिमान : पल्लवी आणि शांतनू अडकले विवाहबंधनात

कारखान्यांनी ऊस नोंद केला नाही तरी ऊस तोडणीची जबाबदारी साखर आयुक्तालय घेईल. त्यासाठी शेतकर्‍यांच्या उसाची तोडणी न केल्यास पर्याय दिलेल्या अन्य कारखान्यांमार्फत संंबंधित शेतकर्‍यांच्या उसाच्या तोडीचे आदेश आयुक्तालयाकडून संबंधित कारखान्यास देण्यात येतील.

ऑनलाईनद्वारे अ‍ॅपवर उपलब्ध होणार्‍या माहितीतून म्हणजे नोंदीची माहिती पूर्ण होताच साखर कारखाना कार्यक्षेत्रातील एकाच गट नंबरवरील ऊस गाळपासाठी नोंदलेली दुबार नावे स्पष्ट होणार आहेत. ती नावे कमी करण्यासही कारखान्यांना मदत होईल. ज्यामुळे राज्यातील उसाचे निश्चित क्षेत्र व ऊस गाळपाचा बिनचूक आकडाही अगोदरच मिळण्यास मोठी मदत होणार आहे.

कारखान्यांनाही त्यांच्याकडील गाळपासाठी ऊस नोंद केलेल्या शेतकर्‍यांची नावे पाहता येतील, अशी सुविधा देण्यात येणार आहे. तसेच मोबाईल अ‍ॅपचे नावही लवकरच स्पष्ट करण्यात येणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

Back to top button