पिंपरी : पुढारी वृत्तसेवा
राज्यातील सर्व शाळा 13 जूनपासून सुरू होणार आहेत. त्यामुळे शहरातील बाजारपेठा शालेय साहित्यांनी गजबजून गेल्या आहेत. पालकांना पुढील एक आठवडा शालेय साहित्य खरेदीसाठी मिळणार आहे. मात्र, ऐनवेळेस घाई नको म्हणून पालक आत्तापासून खरेदीसाठी दुकानांमध्ये गर्दी करत आहेत.
गेली दोन वर्षे कोरोनामुळे ऑनलाईन शाळा होत्या. त्यामुळे पुस्तके आणि वह्या अशा गरजेच्या वस्तू सोडल्या तर शालेय साहित्याला मागणी नव्हती. यंदाचे शालेय शैक्षणिक वर्ष हे ऑफलाइन असल्याने पाल्यासाठी वह्या, पुस्तके, दप्तर, कंपास, बुट, रेनकोट, छत्री, गणवेश आदी घ्यावेच लागणार असल्याने यंदा पालकांचा खरेदीस चांगला प्रतिसाद आहे.
यंदा शालेय साहित्याच्या किंमती 30 ते 40 टक्क्यांनी वाढल्या आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत काही प्रमाणात वह्यांच्या किंमती वाढल्या आहेत. एका वही मागे 7, 10,15, 20 असा फरक पडला आहे. तरी बजेटनुसार त्या खरेदी करण्याकडे पालकवर्गाचा कल आहे. गेल्यावर्षी शंभर पानी 150 रूपये डझन होती ती सध्या 270 ते 280 रुपये डझन, दोनशे पानी 300 रूपये डझनची आता 420 रुपये डझन, फुलस्केप पानी 400 रुपये डझन होती ती 540 रुपये अशा दराने उपलब्ध आहेत.
मुलांच्या आवडीनुसार कार्टुन, गाड्यांची चित्रे, खेळाडूंचे फोटो, यांची चित्रे वह्यांवर दिसत आहेत. लहान मुलांना आवडतील अशा भडक रंगांच्या, कार्टुन्सचे कव्हर असलेल्या वह्या, दप्तर, वॉटर बॅग, कंपास उपलब्ध आहेत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत विविध रंगांच्या व आकाराच्या बॅग्ज बाजारात आल्या आहेत.
यावर कार्टुनसची चित्रे, बार्बी डॉल, अॅग्री बर्ड, स्पायडर मॅन, बेनटेन, डोरा, डोरेमॉन यांची चित्रे असलेल्या बॅगांना मुलांची जास्ती पसंती मिळते. या बॅगा 300 ते दीड हजार रूपयांपर्यंत उपलब्ध आहेत. तसेच टिफीनसाठी देखील विविध प्रकारच्या आकर्षक बॅग विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या आहेत यावर देखील इतर बॅगप्रमाणे कार्टुन्सची छाप पडलेली दिसून येत आहे. यांच्या किंमतीही 150 पासून ते 500 रूपयांपर्यत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी वॉटरबॅग आणि वेगवेगळ्या आकाराच्या रंगाच्या बॉटल्स यांची बाजारात मोठ्या प्रमाणत आवक झाली आहे.
यंदा शालेय साहित्य खरेदीस ग्राहकांचा चांगला प्रतिसाद आहे. पण वस्तूच्या किंमती 30 ते 40 टक्क्यांनी वाढल्या आहेत आणि साहित्याचा तुटवडा आहे. आमची खरेदी वाढली पण एमआरपी वाढली नसल्याने वस्तू विकणे कठीण जात आहे. कंपनी वस्तूच्या एमआरपी वाढवित नाही. कारण ब्रँड असल्याने ग्राहक त्या वस्तू घेतातच. यामध्ये फक्त ग्राहकांचाच विचार केला जातो, असे एका शालेय साहित्य विक्रेत्याने सांगितले.
हेही वाचा