मिसरूडही फुटले नाही अन्.! 154 अल्पवयीन मुलांवर गंभीर गुन्हे; खून, बलात्कार आणि दरोड्यात सहभागी

मिसरूडही फुटले नाही अन्.! 154 अल्पवयीन मुलांवर गंभीर गुन्हे; खून, बलात्कार आणि दरोड्यात सहभागी

संतोष शिंदे

पिंपरी : ओठावर मिसरूड न फुटलेल्या कोवळ्या मुलांचा खून, बलात्कार, चोरी, दरोडा यांसारख्या गंभीर गुन्ह्यात सहभाग वाढू लागला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये मागील चार महिन्यांत एकूण 154 अल्पवयीन मुलांवर अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे पालकांनी मुलांशी संवाद वाढवून सजग राहण्याची आवश्यकता असून, मुलांच्या हालचालींवर लक्ष ठेवून चुकीच्या सवयींना वेळीच पायबंद घालण्याचे आवाहन पोलिस यंत्रणेकडून करण्यात आले आहे.

शहरातील वाढत्या गुन्हेगारीला चाप लावण्यासाठी पुणे शहर आणि ग्रामीण पोलिसांचा काही भाग जोडून पिंपरी- चिंचवड पोलीस येथे नवीन आयुक्तालय सुरु करण्यात आले. 15 ऑगस्ट 2018 रोजी आयुक्तालयाचा कारभार सुरु करण्यात आला. काही महिन्यातच गुन्हेशाखेची पथके सुरु करण्यात आली. त्यामुळे शहरात पोलिसांचा वावर वाढला व नामचीन गुन्हेगारी टोळ्यांनी अक्षरशः नांगीच टाकली; मात्र तरीदेखील गुन्ह्यांचा आलेख वाढतच आहे. याचे मुख्य कारण म्हणजेच गुन्हेगारी कृत्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा वाढता सहभाग.

मागील काही वर्षांपासून शहरातील गुन्हेगारीचे स्वरूप बदलले आहे. अल्पवयीन मुलांमध्ये भाईगिरीची क्रेज मोठ्या प्रमाणात तयार होऊ लागली आहे. यातूनच मागील चार महिन्यात आठ अल्पवयीन मुले खुनासारख्या गुन्ह्यात अडकले आहेत. तर, पाच जणांनी खुनाचा प्रयत्न केला आहे. याव्यतिरिक्त अलीकडे गुन्हेगारी क्षेत्रात रस्त्यावर पार्क केलेल्या नागरिकांच्या गाड्या फोडण्याचा एक नवीन फंडा आला आहे. भर रस्त्यावर नंग्या तालवारींचा नाच करीत तोडफोड करणारी मुले कुठल्याही गँगशी जोडलेली नाहीत. दारूच्या नशेत असे प्रकार घडत आहेत. तोडफोड करणार्‍या बहुतांश मुलांचे कसलेही रेकॉर्ड पोलिसांकडे नाही. प्रत्येक वेळी नवीन आरोपी असल्याने त्यांच्यावर जरब बसविताना पोलिसांना देखील मोठ्या अडचणी येत आहे. बहुतांश गुन्ह्यात अल्पवयीन आरोपींवर घरातील कोणाचाही धाक किंवा लक्ष नसल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. पालकांनी आपल्या पाल्यावर चांगले संस्कार करून जबाबदारी व्यवस्थित पार पाडल्यास मुलांना गुन्हेगारीपासून रोखता येऊन शकते, असे जाणकारांचे मत आहे.

चोर्‍यांसाठी लहान मुलांचा वापर ?

शहरात घडणार्‍या चोरीच्या गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग समोर येऊ लागला आहे. मागील अडीच वर्षात वाहन चोरी, इतर चोरी, दरोडा, जबरी चोरी प्रकरणी एकूण 250 अल्पवयीन मुलांवर गुन्हे दाखल झाले आहेत. अल्पवयीन मुलांसाठी कायद्यात विशेष तरतूद आहे. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांना बाल न्याय मंडळासमोर हजर केले जाते. तेथून समज देऊन घरी किंवा एखाद्या संस्थेत पाठवले जाते. कायद्यातील या तरतुदीमुळे अल्पवयीन मुलांना कसलाही त्रास होत नाही. त्यामुळे अल्पवयीन चोरट्यांचे धाडस वाढू लागले आहेत. तसेच. कायद्यातील या पळवाटांचा फायदा घेत मोठे गुन्हेगार अल्पवयीन मुलांचा वापर करीत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

16 अल्पवयीनांवर बलात्काराचा गुन्हा

पिंपरी- चिंचवडमध्ये मागील अडीच वर्षात 16 अल्पवयीन मुलांवर बलात्कार केल्याचा गंभीर गुन्हा दाखल झाला आहे. मोबाईलवर पाहिल्या जाणार्‍या पॉर्न व्हिडीओमुळे कोवळी मुले वासनांध होत असल्याचे पोलिस सांगतात. अशा प्रकारचे गुन्हे घडण्यामागे मोबाईल हे एक महत्वाचे कारण आहे. त्यामुळे मुलांचा मोबाईल पालकांनी वेळोवेळी तपासाला पाहिजे. तसेच, रात्री झोपताना मुलांकडे मोबाईल असणार नाही, याची खबरदारी देखील घेणे आवश्यक आहे.

अलीकडे घडणार्‍या गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग वाढल्याची बाब खरी आहे. गुन्हेगारी क्षेत्रात आलेल्या मुलांचे पोलिस प्रशासनाकडून वेळोवेळी समुपदेशन केले जाते. तसेच, दरम्यानच्या काळात झोपडपट्टीमध्ये जाऊन मुलांचे समुपदेशन व त्यांच्यासाठी रोजगार निर्मिती करण्यात आली; मात्र, पालकांसह समाजातील प्रत्येकाने जबाबदारी उचलली पाहिजे, तरच अल्पवयीन मुलांना योग्य दिशा मिळून चांगची पिढी निर्माण होईल.

– आनंद भोईटे, उपायुक्त, पिंपरी- चिंचवड.

वर्ष      दाखल गुन्हे      अल्पवयीन मुलांची संख्या

2019      182                         253
2020     162                         239
2021      237                         307
2022      98                           154  (एप्रिल अखेर)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news