पुणे : रोजगार हमी योजनेत उद्दिष्टापेक्षाही अधिक रोजगार उपलब्ध

पुणे : रोजगार हमी योजनेत उद्दिष्टापेक्षाही अधिक रोजगार उपलब्ध

पुणे : पुढारी वृत्तसेवा

गेल्या वर्षभरात जिल्हा प्रशासनाने रोजगार हमी योजनेतील अनेक कामे शेतकर्‍यांशी जोडली. त्यामुळे रोजगार हमीच्या कामांना चांगला प्रतिसाद मिळत असून, सन 2021-22 या आर्थिक वर्षात उद्दिष्टापेक्षा अधिक म्हणजेच 138.81 टक्के रोजगार उपलब्ध झाला आहे.
जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमीमध्ये सार्वजनिक आणि वैयक्तिक स्वरूपाची 262 प्रकारची कामे केली जात आहेत. जिल्ह्यात औद्योगिक वसाहती (एमआयडीसी) असल्याने रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.

यामुळेच रोजगार हमी योजनेच्या कामांना कामगार मिळत नव्हते. सार्वजनिक कामे असल्याने कामाची मागणीच होत नव्हती. जिल्ह्यात गेल्या वर्षी पाच लाख 76 हजार 119 दिवस रोजगार देण्याचे उद्दिष्ट होते. प्रत्यक्षात 7 लाख 94 हजार 972 दिवस रोजगार मिळाला असून, त्यावर 26 कोटी 68 लाख रुपये खर्च केले आहेत. शेतकर्‍यांना आपल्याच शेतात कामासाठी वैयक्तिक विकासाची अनेक स्वरूपाची कामे रोजगार हमीवर देण्यात आली.

यामुळेच जिल्ह्यात गतवर्षी विहीर पुनर्भरण आणि चालू वर्षीदेखील रोजगार हमी गाळ योजनेतून मोठ्या प्रमाणात विकासकामे, सार्वजनिक कामे व लाखो लोकांच्या हाताला काम मिळाले आहे. सध्या जिल्ह्यात इंदापूर, बारामती, जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यात वन विभागाची सार्वजनिक कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत.

क्लस्टर स्वरूपात मोठी कामे

रोजगार हमी योजनेतून पाणंद रस्ते तलावातील रेशीम शेती, बांबू लागवड, फळबाग काढणे, यांसारख्या वैयक्तिक कामांसोबतच वैयक्तिक लाभाच्या योजना घेण्यास सुरुवात केली आहे. क्लस्टर स्वरूपात मोठी कामेदेखील केली जात आहेत.

पुणे जिल्ह्यात विहीर पुनर्भरण, पाणंद रस्ते, शोषखड्डे, तलावातून गाळ काढणे या सार्वजनिक कामांसोबतच रोजगार मिळू शकतो. घरकुल योजनेची कामे, फळवड, बांबू लागवड, रोपवाटिका, रेशीम शेती, मत्स्यपालन, जमीन सपाटीकरण, गायी-गुरांचा गोठा, अशी अनेक कामे सुरू आहेत.

                             – डॉ. वनश्री लाभशेटवार, उपजिल्हाधिकारी, रोजगार हमी, पुणे

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news