हॉटेल मॅनेजमेंट कोर्समुळे स्वत:ची नवी ओळख निर्माण करण्याची संधी : शेफ डॉ. इबेन मॅथ्यू | पुढारी

हॉटेल मॅनेजमेंट कोर्समुळे स्वत:ची नवी ओळख निर्माण करण्याची संधी : शेफ डॉ. इबेन मॅथ्यू

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : तंत्रज्ञान वाढल्याने सर्व गोष्टी सहज उपलब्ध होत आहेत. हॉटेल मॅनेजमेंटचे क्षेत्र घरापासून ते इतरांना आनंदी ठेवणारे आहे. या कोर्समुळे जग जवळून पाहण्याची व स्वत:ची नवी ओळख निर्माण करण्याची संधी प्राप्त होते, असे प्रतिपादन अजिंक्य डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटीचे शेफ डॉ. इबेन मॅथ्यू यांनी केले.

दै.‘पुढारी’ आयोजित व संजय घोडावत युनिव्हर्सिटी प्रस्तुत ‘एज्यु दिशा-2022’ शैक्षणिक प्रदर्शनात ते ‘हॉटेल मॅनेजमेंट-सर्वाधिक रोजगार देणारे क्षेत्र’ या विषयावर बोलत होते. डॉ. मॅथ्यू यांनी हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्राची माहिती देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, अन्नपदार्थ उगवतो तेथपासून ते हॉटेलमध्ये पोहोचविणारा शेफ असतो. हॉटेल मॅनेजमेंट कोर्स करणार्‍यास हॉटेल्स, क्रूज, एअरलाईन्स, कॅबिन क्रू, कॉर्पोरेट कंपनीज, रेल्वे आदी विविध ठिकाणी संधी उपलब्ध आहेत.

प्रा. प्रणाली थोरात म्हणाल्या, करिअर निवडताना त्यातून मिळणार्‍या संधी पाहण्याचे महत्त्वाचे आहे. हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्र लोकांना 24 तास सेवा देणारे आहे. या कोर्समुळे जगाच्या कुठल्याही भागात जाऊन नोकरीची संधी मिळते. मात्र, इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळविणे आवश्यक आहे. हॉटेल मॅनेजमेंट कोर्स करण्यासाठी पॅशनबरोबरच नवीन काहीतरी करण्याची जिद्द ठेवल्यास यशस्वी होणे शक्य आहे. प्रा. प्रीती लांबट यांनी हॉटेल मॅनेजमेंटच्या कोर्सची अद्ययावत माहिती दिली. पूर्वी इंडस्ट्रीला आवश्यक प्रशिक्षित मनुष्यबळ मिळत नसल्याने प्लेसमेंट होत नव्हत्या. अलीकडील काळात मार्केट रिसर्चप्रमाणे हॉटेल मॅनेजमेंट कोर्स डिझाईन केले जात आहेत. कोर्स पूर्णत्वानंतर काही काळाने स्वत:चा बिझनेस, स्टार्टअप सुरू करणे विद्यार्थ्यांना शक्य होणार आहे.

Back to top button