बेळगाव : सीमाप्रश्‍नी 15 दिवसांत तज्ज्ञ समितीची बैठक; जलसंपदा मंत्री जयंत पाटील | पुढारी

बेळगाव : सीमाप्रश्‍नी 15 दिवसांत तज्ज्ञ समितीची बैठक; जलसंपदा मंत्री जयंत पाटील

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍नी तज्ज्ञ समितीची बैठक 10 जूनच्या आधी बोलावण्यात येईल. त्यानंतर मुख्यमंत्र्यांना उच्चाधिकार समितीची बैठक बोलवण्यासाठी विनंती करण्यात येईल, अशी ग्वाही जलसंपदा मंत्री तथा तज्ज्ञ समिती नूतन अध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने शनिवारी (दि. 28) इस्लामपूर येथे मंत्री जयंत पाटील, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेतली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

मंत्री पाटील यांचे समिती शिष्टमंडळाने अभिनंदन केले. यावेळी मंत्री पाटील म्हणाले, दोन दिवसांत अधिकार्‍यांशी चर्चा करून तज्ज्ञ समितीची बैठक घेण्याबाबत सूचना करणार आहे. 10 जूनच्या आधी ही बैठक होईल. सीमाप्रश्न लवकर सुटावा यासाठी तज्ज्ञ समिती बैठकीत जे मुद्दे येतील त्याबाबत तातडीने पावले उचलली जातील. या बैठकीनंतर सीमाप्रश्‍नी उच्चाधिकार समितीची बैठक बोलावण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्यात येईल.

मध्यवर्तीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी सर्वोच्च न्यायालयातील दाव्याला गती मिळावी, यासाठी अतिरिक्त वकिलांची नेमणूक करण्यासह इतर गोष्टी तातडीने करणे आवश्यक असल्याची माहिती दिली. तसेच सीमाप्रश्न आतापर्यंत तीन मंत्र्यांची नेमणूक करण्यात आली आहे मात्र यापैकी एकाही मंत्र्याने आतापर्यंत बेळगावला भेट दिलेली नाही. त्यामुळे समन्वयक मंत्री यावेत यासाठी सूचना करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी मंत्री पाटील यांनी आधी तज्ज्ञ समितीची बैठक घेऊनच बेळगावात येणार असल्याचे सांगितले. माजी आमदार मनोहर किणेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, एपीएमसी माजी सदस्य महेश जुवेकर, सुनील आनंदाचे आदी उपस्थित होते.
यावेळी समिती पदाधिकार्‍यांनी शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. तसेच मध्यवर्ती समितीने केलेल्या मागणीची दखल घेतल्याबाबत आभार मानले.

 बेळगावकडे लक्ष द्या

माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी मंत्री हसन मुश्रीफ व जयंत पाटील यांना बेळगावकडे अधिक लक्ष देण्याची सूचना केली. सीमाप्रश्‍नी सर्व अडचणी दूर कराव्यात, असे सांगितले.

तज्ज्ञ समितीची बैठक झाल्यानंतर मंत्री जयंत पाटील बेळगावचा दौरा करणार आहेत. उच्चाधिकार समितीची बैठकही लवकरच घेण्याबाबत निर्णय होईल, असे त्यांनी सांगितले असून शरद पवार यांनी सीमाप्रश्‍नी मंत्री हसन मुश्रीफ आणि जयंत पाटील यांना लक्ष घालण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे लढ्याला चालना मिळणार आहे.
 मनोहर किणेकर, माजी आमदार

Back to top button