हुंडाबळी! तीन सख्ख्या बहिणींची आत्महत्या, मृतांमधील दोघी गरोदर | पुढारी

हुंडाबळी! तीन सख्ख्या बहिणींची आत्महत्या, मृतांमधील दोघी गरोदर

पुढारी ऑनलाईन डेस्क : राजस्थानमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील तीन सख्ख्या बहिणींनी त्यांच्या दोन चिमुरड्यांसह आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. कालू मीना, ममता आणि कमलेश अशी या महिलांची नावे आहेत. या तिघींचे वय अनुक्रमे 25, 23 आणि 20 वर्षे आहे. तर मृत मुलांपैकी एकाचे वय चार चर्षे आणि दुस-याचे चिमुकल्याचे वय अवघे 27 दिवस आहे. आत्महत्या केलेल्या तीनपैकी दोन महिला गर्भवती असल्याचेही समजते आहे. दरम्यान, तिन्ही बहिणींनी सासरच्या लोकांकडून हुंड्यासाठी होणा-या छळाला कंटाळून आत्महत्या केली आहे, असा आरोप मुलींच्या कुटुंबियांकडून आरोप केला गेला आहे.

मृत विहाहितांच्या हेमराज या चुलत भावाने या प्रकरणी गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, माझ्या बहिणींचा हुंड्यासाठी सतत छळ केला जात होता. त्या २५ मे रोजी बेपत्ता झाल्या होत्या. आम्ही त्यांना शोधण्यासाठी घरोघरी फिरलो. आम्ही स्थानिक पोलीस ठाण्यात फोन केला आणि महिला हेल्पलाइनवर एफआयआर दाखल केली. तसेच राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार केली पण आम्हाला मदत मिळाली नाही.

दरम्यान, सर्वात धाकटी बहीण कमलेशने एक व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवले होते, त्यावरून मोठा खुलासा होत आहे. या स्टेटसमध्ये म्हटले होते की, ‘आम्ही आता निघतोय, आनंदी राहा, आमच्या मृत्यूचे कारण आमचे सासरे लोक आहेत, रोज मरण्यापेक्षा एकदाच मेलेले बरे. म्हणूनच आम्ही एकत्र मरण्याचा निर्णय घेतला आहे. पुढच्या जन्मात आम्ही एकत्र जन्म घेऊ. आम्हाला मरायचे नाही पण आम्ही सासरच्यांकडून होणा-या त्रासाला कंटाळून हे पाऊल उचलत आहे. आमच्या मृत्यूमध्ये माझ्या आई-वडिलांचा दोष नाही.’

बेपत्ता झाल्यानंतर चार दिवसांनी पोलिसांनी शनिवारी सकाळी डुडू गावातील विहिरीतून तिन्ही पीडित महिला आणि दोन मुलांचे मृतदेह बाहेर काढले. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, पीडितेच्या पती आणि सासरच्या लोकांविरुद्ध क्रूरतेसह इतर गुन्ह्यांसाठी गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि आता मूळ एफआयआरमध्ये हुंड्यासाठी मृत्यूचा गुन्हा जोडला जाईल. या हत्येप्रकरणी पोलीस तिन्ही महिलांचे पती, सासू आणि इतर कुटुंबीयांची चौकशी करत आहेत.

या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी राजस्थानमधील महिला कार्यकर्त्यांनी केली आहे. महिलांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी ४ दिवस लागलेल्या पोलिसांवर कारवाई करण्याची मागणीही महिला कार्यकर्त्यांनी केली आहे.

Back to top button