

राजगुरूनगर; पुढारी वृत्तसेवा : पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्याच्या पूर्व भागातील दावडी येथे १६ वर्षीय अल्पवयीन मुलाने वडील दारू पिऊन शिवीगाळ मारहाण करत असल्याच्या कारणावरुन वडिलांच्या डोक्यात लोखंडी घण घालून खून केल्याची घटना घडली.
या घटनेमुळे दावडी परिसरात खळबळ उडाली. ही घटना मंगळवारी रात्री घडली. याबाबत खेड पोलिसांनी अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले आहे.
याबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दावडी गावचे हद्दीत कान्हुरमळा, चिंचोशी रोड, येथे मयत व त्यांचा १६ वर्षीय लहान मुलगा राहत होते. त्यांचा म्हशी पालन व दुग्ध व्यवसाय आहे.
वडील रोज दाऊ पिऊन १६ वर्षीय मुलाला शिवीगाळ मारहाण करून काम करण्यास लावत होते.
काल मंगळवारी मयत वडिलांनी १६ वर्षीय मुलाला दिवसभर शिवीगाळ व मारहाण केली होती.
तसेच दिवसभर जेवायला व रात्री गोठ्यामध्ये अंथरूण पांघरून न देता झोपण्यास लावल्याने मुलाला राग आला होता.
त्यामुळे त्याने रागाच्या भरात गोठ्यातील लोखंडी घणाने वडिलांच्या डोक्यात घाव घालून खून केला.
या घटनेबाबत मोठ्या भावाने लहाण भावाच्या विरोधात वडिलांच्या खूनाची फिर्याद दिली.
घटनास्थळी खेड पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक सतीश गुरव, उपनिरिक्षक भारत भोसले, पोलिस हवालदार सचिन गिलबिले यांनी भेट देऊन पंचनामा केला. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक राहूल लाड करीत आहेत.
हे ही वाचलं का?