नगर : बोल्हेगाव अतिक्रमणाला राजकीय वळण; विरोधासमोर मनपाचे पथक माघारी | पुढारी

नगर : बोल्हेगाव अतिक्रमणाला राजकीय वळण; विरोधासमोर मनपाचे पथक माघारी

नगर : पुढारी वृत्तसेवा

बोल्हेगाव येथील सर्व्हे क्रमांक 68 मधील जागेची मोजणी करण्यासाठी गेलेले अतिक्रमण निर्मूलन विरोधी पथक मोजणी न करताच माघारी फिरले. अतिक्रमणधारकांसह शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी तीव्र विरोध केल्याने पथकाला माघारी फिरावे लागले. पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर अतिक्रमणधारकांना महापालिकेने चार दिवसांची मुदत दिली आहे. दरम्यान, राजकीय पदाधिकार्‍यांनी त्यात हस्तक्षेप केल्याने अतिक्रमणाला राजकीय वळण लागल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

बोल्हेगाव येथील सर्व्हे क्रमांक 68 मधील अतिक्रमण हटविण्यासाठी महापालिका आयुक्त शंकर गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी तिक्रमण निर्मूलन विरोधी पथकाचे प्रमुख सुरेश इथापे फौजफाट्यासह दाखल झाले होते. त्यांच्याबरोबर पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्यासह मोठा पोलिस बंदोबस्त होता. अतिक्रमण विरोधी पथक जेसीबी लावून अतिक्रमण काढण्याच्या तयारीत असताना महिला व पुरुषांनी एकत्रित घेऊन मोठा गोंधळ घातला.

शिवसेनेचे माजी शहर प्रमुख दिलीप सातपुते, माजी महापौर अभिषेक कळमकर, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, योगीराज गाडे आदींनी अतिक्रमण काढण्यास विरोध केला. पोलिसांनी मध्यस्ती केल्याने चार दिवसात अतिक्रमण स्वतः होऊन काढून घेण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या. सोमवारी पुन्हा अतिक्रमण मोहीम राबविण्यात येणार आहे.

अतिक्रमणधारक म्हणाले नोटीस नाही

बोल्हेगाव येथील अतिक्रमण महापालिकेच्या जागेत आहे. अतिक्रमण निर्मूलन विरोधी पथक घटनास्थळी पोहोचल्यानंतर अतिक्रमणधारकांनी आम्हाला नोटीस नसल्याचा दावा करत विरोध केला. मात्र, कायद्यातील तरतुदीनुसार शासकीय जागेत कोणीही अतिक्रमण केल्यास त्यांना नोटीस देणे बंधनकारक नसते. त्यामुळे नोटीस न देता अतिक्रमण पाडण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

रस्त्याच्या जागेवर अतिक्रमण असून, तिथे 25 दुकाने आहेत. केवळ मानवतेचा दृष्टिकोन ठेवून आजची कारवाई स्थगित करण्यात आली आहे. अतिक्रमण काढण्यासाठी त्यांना चार दिवसांची मुदत दिली आहे.

                                                        -सुरेश इथापे, शहर अभियंता.

90 गुंठे जागा महापालिकेची आहे. शासकीय जागा असल्याने नोटिसीची गरज नाही. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी मोहीम थांबविली. पोलिस बंदोबस्त मिळाल्यानंतर लगेच मोहीम राबविण्यात येणार आहे.
                                                      -शंकर गोरे, आयुक्त महापालिका.

बोल्हेगाव येथील अतिक्रमण हटविण्याची कारवाई केवळ राजकीय दबावातून आहे. त्या जागेसंदर्भात न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. दुसरीकडे अतिक्रमणधारकांना कोणतीही नोटीस न देता थेट कारवाई सुरू करण्यात आली. गोरगरिबांच्या तोंडातील घास हिसकावून घेण्याचा प्रयत्न पालिका करीत आहेत. त्यास आमचा विरोध आहे.
                                               -दिलीप सातपुते, माजी शहर प्रमुख शिवसेना.

 

Back to top button