औरंगाबाद एकतर्फी प्रेमातून खून : "सुखप्रीत कौर खटला कोर्टात फास्ट ट्रॅक चालवा" | पुढारी

औरंगाबाद एकतर्फी प्रेमातून खून : "सुखप्रीत कौर खटला कोर्टात फास्ट ट्रॅक चालवा"

सुखप्रीत खून प्रकरणात शिख समाजाची मागणी

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : शहराच्या देवगिरी महाविद्यालयातील विद्यार्थीनी सुखप्रीत कौर ग्रंथी हिच्या खून प्रकरणात मारेकऱ्याला लवकर शिक्षा व्हावी, शहरात पुन्हा असे कृत्य कुणीही करू नये, यासाठी या खुनाचा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालविण्यात यावा. या मागणीचे निवेदन बुधवारी (दि. २५) रोजी गुरुद्वारा श्री गुरु सिंग सभेच्या वतीने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्यामार्फत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना सादर करण्यात आले.

गेल्या आठवड्यात शहरातील देवगिरी महाविद्यालय परिसरात बीबीएचे शिक्षण घेणारी १९ वर्षिय महाविद्यालयीन तरुणी ग्रंथी सुखप्रीत कौर प्रीतपाल सिंग हीचा एकतर्फी प्रेमप्रकरणातून खून करण्यात आला. पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे. सध्या हा आरोपी पोलीस कोठडीत आहे. शहरात होत असलेल्या खूनांच्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहरात कायद्याचा धाक निर्माण व्हावा, तसेच अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी मुलींच्या सुरक्षेचा विचार प्रशासनाने करावा, या मागणीसाठी गुरुद्वारा श्री गुरु सिंग सभेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी चव्हाण यांची भेट घेतली.

यावेळी मृत तरुणीचे वडील ग्रंथी प्रीतपाल सिंग हे देखील उपस्थित होते. शहरवासियांत संवेदना उरल्या नाहीत. माझी मुलगी ओरडत असतांनाही कोणीच तिला वाचविण्यासाठी धावून आले नाही, अशी खंत यावेळी प्रीतपाल सिंग यांनी जिल्हधिकाऱ्यांपुढे व्यक्त केली. दरम्यान या खूनाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, जेने करून असे कृत्य करण्यास कोणी धजावणार नाहीत, अशी मागणी शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात आले. यावेळी गुरुद्वारा श्री गुरु सिंग सभेचे अध्यक्ष हरविंदर सिंग बिंद्रा यांच्यासह समितीचे सभासद उपस्थित होते.

विधीज्ञ निकम यांची नियुक्ती करा

सुखप्रीत कौरला तातडीने न्याय मिळावा, आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, यासाठी विधीज्ञ उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी प्रीतपाल सिंग ग्रंथी यांनी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याकडे केली.

हेही वाचलंत का?

Back to top button